मालिकेच्या टीआरपीची गणितं ही दर आठवड्याला बदलत असतात. डिसेंबरच्या शेवटाचा आठवडा हा खऱ्या अर्थानं मराठी मालिकांच्या टीआरपीची गणितं पूर्णपणे बदलणार ठरला आहे. विशेष म्हणजे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेसाठी वर्षाचा शेवट हा गोड झाला आहे. २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या काळातील आघाडीच्या पाच मराठी मालिकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका दुसऱ्या स्थानी आहे.

शंभू महाराजांनी गडावरची बंडाळी मोडून काढत त्यांच्याविरोधात कट कारस्थानं रचणाऱ्यांना अटक केली आहे. शंभू महाराज रायगडावर परतले आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात कारस्थानं रचणाऱ्यांना ते काय शिक्षा घेतात याचं कुतूहल प्रेक्षकांच्या मनात आहे. या मालिकेत अनेक उलथापालथ झालेल्या पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यातील पहिले तीन आठवडे ही मालिका चौथ्या क्रमांकावर होती. मात्र शेवटच्या आठवड्यात ही मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘तुला पाहते रे’ या मालिकांना मागे टाकते दुसऱ्या स्थानी आली आहे.

तिसऱ्या स्थानी ‘चला हवा येऊ’ द्या हा कार्यक्रम आहे. गेल्या आठवड्यात या मालिकेत चित्रपटाचं प्रोमोशन करण्यासाठी ‘सिम्बा’ची संपूर्ण टीम आली होती. यामुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या टीआरपीचं गणितही बदललं. ही मालिका तिसऱ्या स्थानी आली आहे. तर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका चौथ्या स्थानी घसरली आहे. डिसेंबरच्या शेवटाला ‘तुला पाहते रे’ या मालिकेत अनेक ट्विस्ट आले होते . मात्र तरीही ईशा आणि संरजामेच्या प्रेमाची जादू फिकी पडताना दिसत आहे. ही मालिका तिसऱ्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी घसरली आहे. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही राधिका शनायाची माझ्या ‘नवऱ्याची बायको’ ही मालिका आपलं पहिलं स्थान कायम टिकवून आहे.