करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग हे लॉकडाउनमध्ये आहे. लॉकडाउनच्या काळात टीव्ही मालिकांचं चित्रीकरणही ठप्प आहे आणि आपले आवडते कलाकारही आपापल्या घरात बंद आहेत. पण मिळालेला वेळ हा सत्कारणी लावा असं ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर म्हणतेय.
अक्षया पुण्यात तिच्या घरी कुटुंबीयांसोबत आहे. लॉकडाउनमधील तिच्या वेळापत्रकाबद्दल सांगताना ती म्हणाली, “हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न करते. कंटाळा, नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी ते गरजेचं आहे. मी कधी चित्र काढेन असं मला वाटलं नव्हतं पण लॉकडाउनमध्ये मी बऱ्यापैकी चित्रकला शिकलेय. तसंच आईकडून अनेक पदार्थ देखील शिकतेय. आम्ही दोघी मिळून किचनमध्ये काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय मी वाचन, टीव्ही, सिनेमे बघणे यात सध्या वेळ घालवतेय.”
आणखी वाचा : “पायी प्रवास करणाऱ्यांना आत्मनिर्भर म्हणायचं की लाचार?”, विशालचा मोदींना सवाल
अक्षयाचे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत असल्याने लॉकडाउन काळातही त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागतं. “मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. माझे आई-वडील सरकारी सेवेत आहेत. दोघेही अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना या संकटकाळात कामासाठी बाहेर पडावंच लागतं,” असं अक्षयानं सांगितलं.