सोनू सूदच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा ‘तुतक तुतक तुतिया’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. खास या ट्रेलरसाठी किंग खानने आपला आवाज दिला आहे. या ट्रेलरमधून सिनेमातल्या व्यक्तिरेखांची ओळख खुद्द बॉलिवूड बादशहाने करुन दिली आहे. या सिनेमात प्रभू देवा, सोनू सूद, तमन्ना भाटिया आणि अॅमी जॅक्सन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
तिशी पार केलेला प्रभू देवा लग्नासाठी मुलीच्या शोधात असतो. मुंबईतली सगळ्यात उत्तम मॉडेल मुलगी त्याची बायको व्हाही अशी त्याची इच्छा असते. पण त्याचे लग्न तमन्ना भाटिया या सर्वसाधारण मुलीशी होते. ती त्याचे जगणे हैराण करुन सोडते. तर दुसरीकडे सोनू सूद तमन्नासारख्याच दिसणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि या सगळ्या समज गैरसमजात जी गंमत होते ते म्हणजे ‘तुतक तुतक तुतिया’. सोनाली सूद आणि दिपशिखा देशमुख हे या सिनेमाचे सह निर्माते आहेत तर सोनू सूद याने या सिनेमाची निर्मिती केली आहे. विजय यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
या सिनेमात एक आयटम नंबरही आहे ज्यात इशा गुप्ताने नृत्य केले आहे. प्रभू देवा आणि सोनू सूद यांच्याबरोबरचा इशाचे नृत्य अनेकांना पसंत पडत आहे. विपुल शहा यांच्या प्रोडक्शनमधून बनणारा ‘कमांडो २’ या सिनेमात इशा गुप्ता दिसणार आहे. याशिवाय नाडियाडवाला प्रोडक्शनचा ‘हेराफेरी ३’ आणि मिलन लुथारिया यांचा मल्टीस्टारर सिनेमा ‘बादशाहो’ या सिनेमांतही तिच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘तुतक तुतक तुतिया’च्या ट्रेलरमध्ये नृत्यदिग्दर्शक फराह खानही दिसत आहे. ट्रेलरवरुनच हा एक विनोदीपट असणार हे तर कळतेच शिवाय यात तमन्नाचा दुहेरी अंदाज लोकांना किती पसंत येतो हेही येणाऱ्या काळात कळेलच. पण तुर्तास प्रभू देवा त्याचे नृत्य आणि त्याचा अभिनय याची नवी मजा त्याच्या फॅन्सना घेता येणार आहे. ७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2016 रोजी प्रकाशित
‘तुतक तुतक तुतिया’ सिनेमाला किंग खानचा आवाज
मुंबईतली सगळ्यात उत्तम मॉडेल मुलगी त्याची बायको व्हाही अशी प्रभूची इच्छा असते
Written by लोकसत्ता टीम

First published on: 11-09-2016 at 20:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tutak tutak tutiya official trailer release