बॉलिवूड नगरीत जेवढ्या लवकर लोकं प्रेमात पडतात तितक्याच लवकर त्यांच्यात ब्रेकअपही होतात. त्यानंतर परत काही दिवसांनी ते एखाद्या दुसऱ्या रिलेशनशिपमध्येही पडल्याचे पाहायला मिळते. लग्न आणि नाती यांचा पोरखेळच बॉलिवूडमध्ये सुरु आहे असे वाटत असताना ‘मिसेस फनिबोन्स’ म्हणजे ट्विंकल खन्ना मात्र तिची अक्षयसोबतची ‘टीम’ अजूनही एन्जॉय करतेय. एका कार्यक्रमात अक्षय आणि तिच्या नातेसंबंधांवर ट्विंकलने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
१६ वर्षांपूर्वी अक्षय आणि ट्विंकल विवाह बंधनात अडकले. बॉलिवूडमधील या सुंदर जोडप्याला आरव आणि नितारा ही दोन मुलंही आहेत. लग्नाबद्दल बोलताना ट्विंकल म्हणाली की, मला वाटतं मी आणि अक्षय एक सॉलिड टीम आहोत. लग्न टिकण्यासाठी उत्तम टीम असणे हे फार आवश्यक असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर सेक्सही तितकंच महत्वाचं असतं. ‘एवढ्या वर्षांमध्ये मला अक्षयमध्ये आवडणाऱ्या गोष्टींमध्ये बदल होत गेला आहे.’ आपला स्पष्टवक्तेपणा आणि विनोदबुद्धीसाठी ट्विंकल बॉलिवूड वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असते. पण तिला अक्षयची शांत आणि विचार करुन बोलण्याची सवय आत्मसात करायची आहे.
अक्षयचं एक गुपितंही तिने यावेळी उघड केलं. ‘अक्षयकडे माझ्यापेक्षा जास्त चपलांचे जोड आहेत तसेच माझा स्तंभलेख प्रकाशित होण्यापूर्वी सर्वात आधी तो वाचतो त्यात आवश्यक ते बदल करतो आणि त्याला गुणही देतो. अक्षयला माझ्यापेक्षा माणसं अधिक समजतात. लोकं कोणत्या भावनेने बोलतात हेही त्याला उत्तम कळते.’ मातृत्वाबद्दल बोलताना ट्विंकल म्हणाली की, ‘तो एक आयुष्य बदलणारा अनुभव होता. तेव्हा तुम्ही प्रेम आणि वेदना या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अनुभवत असता.’
अक्षय कुमारच्या आगामी ‘पॅडमॅन’ या सिनेमाची निर्मिती ट्विंकल खन्ना करत आहे. या सिनेमात अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अक्षय आणि ट्विंकल काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्येही एकत्र गेले होते.