अभिनेत्री आणि नंतर लेखिका म्हणून नावारुपास आलेल्या ट्विंकल खन्नाला कोणीही बोलण्यापासून थांबवू शकत नाही. ती अगदी ठामपणे तिचे विचार सोशल मीडियावर मांडते. काही दिवसांपूर्वीच तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिला नेटिझन्सच्या टीकेचा सामना करावा लागला. मात्र, त्या टिकांनासुद्धा तिने जुमानले नाही. आता ‘मिसेस फनीबोन्स’ म्हणजेच ट्विंकलने तिचा मोर्चा पुन्हा एकदा ट्विटरकडे नेला असून, यावेळी तिहेरी तलाक आणि खासगीपणाचा हक्क (राइट टू प्रायव्हसी) यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर तिने आपले मत मांडले आहे.

वाचा : ‘सैराट’साठी करण जोहरला मदत करण्यास नागराज मंजुळेचा नकार!

ट्विंकलने कंटाळलेली बायको आणि पतीमधील विनोदी संभाषण ट्विट केलेय. तिने लिहिलंय की,
‘नवरा : कुठे जातेयस तू?
त्रस्त बायको : तुम्हाला सांगण्याची गरज नाही #RightToPrivacy
नवरा : तलाक तलाक तलाक
त्रस्त बायको: खूप उशीर, खूप उशीर, खूप उशीर’

या ट्विटला ट्विंकलने ‘काय आठवडता होता’ ( #WhatAWeek ) असा हॅशटॅगही दिला. भारतातील दोन मोठ्या घडामोडींवर ट्विकलने केलेल्या या ट्विटवर तिचे चाहते कसे व्यक्त होतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वाचा : सिनेसृष्टीतील झगमगाटामागील राबते हात दुर्लक्षितच

भारतात या आठवड्यात दोन मोठे ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाद्वारे देण्यात आले. प्रत्येक नागरिकाचा खासगीपणाचा हक्क (राइट टू प्रायव्हसी) हा मूलभूत हक्क (फंडामेंटल राइट) असून त्याला राज्यघटनेचे संरक्षण असल्याचा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय घटनापीठाने एकमताने दिला. त्याआधी मंगळवारी तिहेरी तोंडी तलाकची प्रथा घटनाबाह्य व बेकायदा ठरविण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिला.

दरम्यान, ट्विंकल आता निर्माती म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. पती अक्षय कुमारच्या आगामी ‘पॅडमॅन’च्या निर्मितीची धुरा ट्विंकलने स्वीकारली आहे. आर बल्की दिग्दर्शित या चित्रपटात राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.