अक्षय कुमारचा आगामी ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. भारतीय अवकाश संसोधन संस्थेने (ISRO) देखील या ट्रेलरचं कौतुक केलं. विशेष म्हणजे ‘मिशन मंगल’ची भुरळ उत्तर प्रदेश पोलिसांना पडली असून त्यांनी या चित्रपटाच्या टीमचा एक फोटो शेअर करत वाहतुकीचे नियम सांगितले आहेत.

युपी पोलिसांनी मिशन मंगलच्या टीमचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षयकुमार आणि चित्रपटातील अन्य टीम दिसत असून त्यांनी हॅल्मेट घातलं आहे. या हॅल्मेटवर वाहतुकीचे काही नियम आणि वाहने जपून चालविण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

“मिशन मंगल’ची टीम वाहतुकीच्या नियमांचं अंतराळातदेखील उल्लंघन करत नाही. त्यामुळे त्यांचा आदर्श घ्या आणि रस्त्यावर गाडी चालविण्यापूर्वी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्या”, असं कॅप्शन देत युपी पोलिसांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, गाडी सावकाश चालवा, दारु पिऊन गाडी चालवू नये असे संदेश दिले आहेत.

 दरम्यान, शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, इशा तलवार आणि शर्मन जोशी ही कलाकार मंडळी दिसून येत आहेत.