नववर्षाचे एकीकडे जल्लोषात स्वागत होत असतानाच ३१ डिसेंबरच्या रात्री तुफान पार्टी केली जाते. पार्ट्या, नाचणं, गाणं, दारु पिणं या सर्व गोष्टींची रेलचेल असतानाच पोलिसांना मात्र सतर्क राहावं लागतं. ड्रंक अँड ड्राइव्हची प्रकरणं घडू नयेत यासाठी सोशल मीडियावरून पोलीस नागरिकांना सूचना देत असतात, जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांना ड्रंक अँड ड्राइव्हविरोधी मोहिमेत ‘दबंग’मधील चुलबूल पांडेची साथ मिळाली आहे. पोलिसांनी ट्विटरवर सलमानच्या ‘दबंग’ अंदाजातील भन्नाट मेसेज तयार करून पोस्ट केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

ट्विटरवरील या पोस्टमध्ये विशेष लक्ष वेधून घेण्याचं कारण म्हणजे ‘दबंग’ खान अर्थात सलमानचा वापरण्यात आलेला फोटो. ‘दबंग’ या चित्रपटात सलमानने साकारलेली पोलिसाची भूमिका प्रचंड गाजलेली. याच भुमिकेतील त्याच्या फोटोसह ‘स्वागत नहीं करोगे २०१८ का?, लेकिन जरा संभाल के’ असा संदेश देण्यात आला आहे. इतकंच नाही तर चित्रपटातील सलमानचा गाजलेला डायलॉगचासुद्धा पोलिसांनी हटके अंदाजात वापरला आहे. ‘हम आज सड़कों पर इतनी नाकाबंदी लगाएँगे कि आप कन्फ़्यूज़ हो जाओगे की एंटर कहाँ से करें और भागें कहाँ से!,’ या डायलॉगसह #ZaraSambhalKe हा हॅशटॅग दिला आहे. या संदेशांच्या माध्यमातून ‘ड्रिंक अँण्ड ड्राईव्ह’सारखे प्रकार रोखले जावेत, हा पोलिसांचा उद्देश आहे. सलमानसोबत पोलिसांनी ‘सिंघम’ म्हणजेच अजय देवगणच्या फोटोचाही वापर केला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांचा हा ‘दबंग’ अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून या पोस्टला भरभरून लाइक्स मिळत आहेत.