प्रत्येक सण-उत्सव साजरे करीत समाजातील घटनांशी नाते जोडू पाहणाऱ्या दैनंदिन मालिकांमध्ये सामाजिक विषयांवरील भाष्य अभावानेच येते. कदाचित वाद ओढवून घेण्यापेक्षा मनोरंजनातच खूश राहण्याचा हेतू त्यामागे असावा.. मात्र, लहानथोरांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘जय मल्हार’ मालिकेत सध्या गाजत असलेल्या शाकाहारी-मांसाहारी वादाला स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला.
मल्हारची पहिली पत्नी म्हाळसा व दुसरी पत्नी बानू यांच्यातील सवतिमत्सराची कहाणी दाखवणाऱ्या ‘जय मल्हार’ मालिकेत गडाखाली राहणाऱ्या बानूला गडावर आणण्याच्या हालचालीसंदर्भात सोमवारी काही भाग दाखवण्यात आले. याच भागात महालाच्या खिडकीतून बाहेर पाहत असलेल्या मल्हारकडे म्हाळसा बानूची तक्रार करते, असे दृश्य होते. गडावर बानूला न घेण्याच्या म्हाळसाच्या आग्रहाखातर मल्हार तिला गडाच्या पायथ्याशी वाडा बांधून देतात. मात्र, गडावर येणाऱ्यांना या वाडय़ातून मांसाहारी पदार्थ शिजवण्याचा वास येतो. ते चांगले नाहीत, अशी तक्रार म्हाळसा करते व बानूला जेजुरीबाहेर काढण्याची कल्पना मांडते. म्हाळसावर कधीही आवाज न चढवणारा खंडेराय या वेळी मात्र चिडतो. हे अती होते आहे, असे म्हाळसाला खडसावत बानूने काय खावे हेदेखील आपण ठरवणार आहोत का, असा प्रतिप्रश्न करतो.
मांसाहार करणाऱ्या समाजाला कमी लेखून त्यांच्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी एक गट क्रियाशील झालेला असताना थेट मल्हारी मार्तंडाच्या तोंडून यावर भाष्य करण्याचे धाडस ‘जय मल्हार’च्या निर्मात्यांनी दाखवले आहे. हे दृश्य येथेच संपले असले तरी त्यातून दिलेला संदेश लाखो प्रेक्षकांपर्यंत क्षणार्धात पोहोचला. एकीकडे सामाजिक असहिष्णुतेविरोधात साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी रान उठवायला सुरुवात केलेली असतानाच मनोरंजन क्षेत्रही त्याला पािठबा देण्यासाठी पुढे येत आहे ही सकारात्मक बाजूच मानायला हवी.

मालिकेतील हा संदर्भ मल्हारी मार्तंडाच्या पुराणकथांमधलाच – महेश कोठारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जय मल्हार’ मालिकेत म्हाळसा आणि बानू या दोघीही विभिन्न वातावरणात वाढलेल्या असल्याने दोघींची राहण्या-खाण्यापासूनच्या सवयी आणि विचारांमध्ये टोकाची भिन्नता आहे. दोघींमध्ये सुरू असलेल्या वादात त्यांच्या वैचारिक भिन्नतेचाही परिणाम होत असतो. म्हाळसा सात्त्विक आहार-विचारांमध्ये वाढलेली आहे तर बानू धनगर समाजातील असल्याने मांसाहार हा तिच्या जीवनातील नित्याचा भाग आहे. मालिके त दाखवलेला हा संदर्भ मल्हारी मार्तंडाच्या पुराणकथा आणि विशेषत: जे गोंधळ आहेत आपल्याकडे लिहिलेले त्यातूनच घेतलेला आहे. कळत नकळत या संदर्भाने आजच्या परिस्थितीवर सकारात्मक भाष्य झाले, याबद्दल आनंद आहे.