बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान अनेक नवकलाकारांना संधी देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्याने स्नेहा उल्लाल, कतरिना कैफ आणि झरिन खान अशा अनेकांना बॉलिवूड पदार्पणासाठी मदत केली आहे. त्याच्या या यादीत आता लुलिया वंटुर या रोमानियन सुंदरीचे नाव सामील झाले आहे. ‘दबंग’ चित्रपटाचा अभिनेता सलमान खान त्याच्या या रोमानियन मैत्रिणीला लाँच करण्यासाठी सिद्ध झाला असून, अतुल अग्निहोत्रीच्या ‘ओ तेरी’ चित्रपटातील ‘उम्बक्कुम’ या शीर्षकगीतात ती दिसणार आहे. हे गाणे प्रसिद्ध पंजाबी गायक मिका सिंग याने गायले आहे.
लुलिया आणि सलमानमध्ये काही खास असल्याचेदेखील बोलले जाते. सलमानच्या ‘जय हो’ चित्रपटाच्या चित्रीकरणस्थळी अनेकवेळा ही रोमानियान सुंदरी आढळून आली होती. या चित्रपटाचा काही भाग रोमानियामध्ये चित्रीत करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ‘उम्बक्कुम’ गाण्याच्या चित्रीकरणात सलमानने व्यक्तीगत लक्ष घातल्याचे समजते. गाणे प्रसिद्ध व्हायच्या आधी या गाण्याचे अंतिम रूपदेखील स्वत: जातीने न्याहाळले. सलमान खानच्या अंतिम होकारानंतरच हे गाणे प्रसिद्ध करण्यात आल्याचे चित्रपटाशी संबंधित सुत्रांनी सांगितले.
सदर गाण्यात चित्रपटातील प्रमुख अभिनेत्यांबरोबर लुलिया ठुमके लावताना दिसते. गाण्यात तिने बॉलिवूड लटके-झटके अप्रतिमरित्या सादर केल्याचे देखील दिसून येते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 3:21 am