लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मालिकांचे जुने भाग पुन्हा दाखवण्यात येत आहेत. पण झी युवा वाहिनी या लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी काहीतरी नवीन सादर करत आहे. सोफ्यावर रीलॅक्स मूडमध्ये बसून, हातात कोल्डड्रिंक किंवा कॉफी घेऊन आवडते चित्रपट किंवा मालिकांचे एकापाठोपाठ एक सलग एपिसोड, सीझन बघण्याची मजा काही औरच! म्हणूनच झी युवा वाहिनी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या कथा घेऊन आली आहे.

१७ मे पासून ते ३१ मे पर्यंत प्रत्येक रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळात प्रेक्षकांना ३ नवीन कथांचा आस्वाद झी युवा वाहिनीवर घेता येणार आहे. खाकी वर्दीतील आनंदी माणसाची गोष्ट ‘पांडू’ या कथेमधून २४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिस दिवस रात्र काम करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांची वेगळी बाजू मांडणारी ‘पांडू’ ही कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेतील दत्ता म्हणजेच अभिनेता सुहास शिरसाट यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

निपुण धर्माधिकारीची ‘वन्स अ इयर’ ही सीरिज प्रेमातल्या अविस्मरणीय क्षणांचा प्रवास प्रेक्षकांना घडवेल. यामध्ये निपुण धर्माधिकारी सोबत अभिनेत्री मृण्मयी गोडबोले असून ही गोष्ट रावी आणि अरिहंत त्यांच्या व्यक्तिरेखांभोवती फिरते. या दोघांच्या नात्याचा सहा वर्षांचा प्रवास ३१ मे रोजी प्रेक्षकांना या गोष्टीतून अनुभवायला मिळणार आहे.

काही निवडक कथा झी युवाने या लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर करण्याचे पाऊल उचलले आहे. लॉकडाउनमुळे घरी राहून संपूर्ण परिवारासोबत या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.