करोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. करोना व्हायरसला पसरवण्यापासून थांबवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे सर्वचजण घरात बसले आहेत. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यामातून समाजप्रबोधन करताना दिसत आहेत. अशातच दिग्दर्शक विजू माने यांच्या संकल्पनेतून घरातच राहून सरकारला सहकार्य करा असा सकारात्मक संदेश देणारे एक खास गाणे कलाकरांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मराठी कलाकारांसोबत २१ देशातील नागरिकांचा देखील सहभाग आहे.
या गाण्याचे नाव ‘घे जबाबदारी, तू राहा ना घरी!’ असे असून गाण्यात मराठी कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते. या कलाकारांसोबतच यूके, यूएसए, यूएई, सिंगापूर, न्यूझीलंड, जपान, चीन, नेदरलँड, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, ओमान, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, कॅनडा, आयर्लंड या देशांतील नागरिक देखील या गाण्यात सहभागी झाल्याचे दिसत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री प्रिया बापट, सुमीत राघवन, चिन्मयी सुमीत, भाऊ कदम, कुशल बद्रिके, जितेंद्र जोशी, गौतमी देशपांडे, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, रवी आणि मेघना जाधव, मधुरा वेलणकर, अभिजीत साटम, मकरंद अनासपुरे आणि त्यांचे कुटुंबीय, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, सुनील बर्वे, गायक अभिजीत कोसंबी, सुबोध भावे, पूजा सावंत, मानसी नाईक हे लोकांना घरात राहण्यास सांगत आहेत.
हे गाणे नेहा राजपाल, अभिजीत कोसंबनी, अनुराग गोडबोले, रुपाली मोघे यांनी गायले आहे. तर अनुराग गोडबोले यांनी ते संगीतबद्ध केले आहे. या व्हिडीओमीधील सर्व कलाकरांनी आपापल्या घरात राहून हे व्हिडीओ तयार केले आहेत. ‘सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या गाण्याद्वारे आम्ही सकारात्मक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत’ असे या गाण्याविषयी बोलताना विजू मोने यांनी म्हटले.