अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित ‘३ स्टोरीज’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर वेगवेगळ्या लोकांच्या कथांची तोंड ओळख करुन देण्यात आली आहे. सिनेमात रोमान्स आणि थ्रिलरचा अनोखा तडका पाहायला मिळणार आहे. मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात काही लोकांच्या आयुष्यातील भूतकाळामुळे वर्तमान बिघडलेला दाखवण्यात आला आहे. चाळीत राहणाऱ्या लोकांचे आयुष्य जेवढे सोपे वाटते तेवढे ते कधीच नसते. फरहान अख्तरची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात एकाचवेळी अनेकांच्या आयुष्यातील घटना दाखवण्यात आल्या आहेत.
या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमात शर्मन जोशीची मुख्य भूमिका आहे. शर्मनसोबत पुलकित सम्राट, रेणुका शहाणे, रिचा चड्ढा, प्रतिभा, आयशा अहमद, अंकित राठी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रेणुकाने सिनेमात एका वृद्ध महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे. काही दिवसांपूर्वी रेणुकाने राजश्री प्रोडक्शनसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पुलकीत सम्राटचा वीरे की वेडिंग हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.