64 Packed Suitcases At Rajesh Khanna Bungalow After His Death : बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळखले जाते. त्यांनी असे स्टारडम मिळवले, जे आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याने पाहिले नाही किंवा कल्पनाही केली नाही.

राजेश खन्ना त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जात होते. असे म्हटले जाते की ‘काका’ म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना राजासारखे जीवन जगत होते. ते अनेकदा लोकांसाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करायचे; परंतु नंतर ते स्वतः त्या विसरून जायचे. राजेश खन्ना यांच्या जीवनावर लिहिलेल्या गौतम चिंतामणी यांच्या ‘डार्क स्टार : द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

या पुस्तकात असेही सांगितले आहे की, राजेश खन्ना हे एक रहस्यमय व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी आयुष्यभर स्टारडमचा आनंद घेतला. कालांतरानं त्यांच्या कारकिर्दीला काहीसं ग्रहण लागलं, काहीशी घसरण झाली; पण तरीही राजेश खन्ना यांनी त्यांची लक्झरी लाइफस्टाईल सोडली नाही. शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचे शौक पूर्ण केले.

राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर घरात सापडलेल्या ६४ सुटकेस

पुस्तकात उल्लेख आहे की, जेव्हा राजेश खन्ना परदेश दौऱ्यावर जायचे तेव्हा ते खूप पैसे खर्च करायचे. ते लोकांसाठी भेटवस्तू खरेदी करायचे आणि नंतर ते विसरून जायचे. गौतम चिंतामणी यांनी पुस्तकात सांगितले आहे की, २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या बंगल्यात किमान ६४ सुटकेस सापडल्या होत्या, ज्या पूर्णपणे भरलेल्या होत्या. त्या सुटकेसमध्ये त्यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांवर खरेदी केलेल्या भेटवस्तू होत्या; परंतु ज्यांच्यासाठी त्यांनी त्या खरेदी केल्या होत्या, त्यांना ते देऊ शकले नाहीत.

पुस्तकात लिहिले आहे की, ‘जेव्हा जेव्हा राजेश खन्ना परदेश दौऱ्यावरून परत यायचे तेव्हा तेव्हा ते त्यांच्याबरोबर भेटवस्तू घेऊन यायचे. कधी कधी ते ज्यांच्यासाठी भेटवस्तू आणत असत, त्यांना भेटवस्तू देत असत आणि कधी कधी ते विसरून जायचे. बऱ्याचदा असे व्हायचे की, ते परत येताना त्या भेटवस्तू विसरून जायचे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यात भेटवस्तूंनी भरलेल्या ६४ सुटकेस सापडल्या होत्या.’

या पुस्तकात त्यांच्या एकटेपणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. शेवटच्या काळात त्यांना एकटेपणा आला होता. ज्यांच्याबरोबर आपण काम केलं, ते सहकलाकार जे हयात नाहीत, त्यांच्या आठवणींत ते रमायचे. आपल्या बंगल्यात त्यांना माणसांची रेलचेल आवडायची.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांचे मुंबईत निधन झाले. ते बराच काळ आजारी होते. राजेश खन्ना यांची मैत्रीण अनिता अडवाणी हिने ‘अवंती फिल्म्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, काका खूप आजारी होते आणि खूप रडायचे. त्यांची तब्येत खूप बिघडली होती. अनिता म्हणाली, “ते दिवसभर रडायचे. जणू काही ते त्यांच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेत, असे वाटत होते. ते खूप नकारात्मक गोष्टी बोलत असत.” एकेकाळी राजेश खन्ना यांनी तीन वर्षांत सलग १७ हिट चित्रपट दिले.