आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी तो परदेश दौरेसुद्धा करतोय. सिंगापूरहून तो विराट कोहलीसोबत शूट करण्यासाठी मुंबईला आला होता. विराटसोबत चॅट शोचं शूटिंग संपल्यानंतर लगेचच आमिर इस्तांबूलसाठी रवाना झाला. तिथे मिळालेल्या फावल्या वेळेत बॉलिवूडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट मौजमजा करताना दिसतोय. एक व्हिडिओ नुकताच आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की, ‘सब्र का फल मीठा होता है!’
या व्हिडिओत आमिर तुर्कीमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी एका दुकानाबाहेर उभा असलेला पाहायला मिळतोय. मात्र आईस्क्रीम खाण्यासाठी त्याला वाट पाहावी लागत आहे. कारण दुकानदार मजेशीर आणि अनोख्या पद्धतीने आमिरला आईस्क्रीम देत आहे. हा ‘फन टास्क’ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल. प्रत्येकवेळी जेव्हा आमिर आईस्क्रीम घेण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा दुकानदार गमतीशीर पद्धतीने आईस्क्रीमचा कोन मागे घ्यायचा. त्याच्या करामतीपुढे अखेर आमिर दमतो आणि त्यानंतर दुकानदार स्वत:च त्याला आईस्क्रीम भरवतो. ट्विटरवरील या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आमिरने लिहिलं की, ‘सब्र का फल मीठा’. तुर्कीमधील आईस्क्रीम खाण्याचा हा अनुभव आमिरला चांगलाच लक्षात राहिल असं म्हणायला हरकत नाही.
https://twitter.com/aamir_khan/status/916702760149639168
वाचा : खूशखबर! कपिल शर्मा टेलिव्हिजनवर लवकरच परतणार
आमिरच्या आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम मुख्य भूमिका साकारत आहे. गायिका होण्यासाठी एक किशोरवयीन मुलगी सोशल मीडियाचा आधार घेत कशा प्रकारे स्वप्नांचा पाठलाग करते आणि यात तिला नेमके कोणते अडथळे येतात याचं चित्रण ‘सिक्रेट सुपरस्टार’मधून करण्यात आलं आहे.