मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट’ला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये अनेक बडे कलाकार सहभागी होत आहेत आणि विविध विषयांवर आपली मतं मांडत आहेत.

१ मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘वेव्हज समिट २०२५’ ची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. समिटच्या पहिल्याच दिवशी सुपरस्टार अल्लू अर्जुन सहभागी झाला. ‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुनने ‘वेव्हज समिट’च्या पहिल्या दिवशी ‘टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स’ या पॅनेल चर्चेत भाग घेतला. यावेळी तो भारतीय चित्रपटसृष्टीची जागतिक ओळख आणि त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल मोकळेपणाने बोलला.

अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’ च्या रिलीजनंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला आहे, असा प्रश्न विचारला. त्याने उत्तर देण्याआधी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘वेव्हज समिट’ आयोजित केल्याबद्दल आभार मानले. ‘पुष्पा’ चित्रपटानंतर आयुष्यात झालेल्या बदलांविषयी अल्लू अर्जुन म्हणाला, “प्रत्येक जण आता माझा चेहरा ओळखतो. मी एक प्रादेशिक अभिनेता होतो, पण ‘पुष्पा’ चित्रपटामुळे आता सगळेच मला ओळखतात.”

अल्लू अर्जुनने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले

पॅनेल चर्चेदरम्यान, अल्लू अर्जुनने त्याचा पुढील चित्रपट ‘AA22xA6’ बद्दल सांगितले. हा त्याचा २२ वा चित्रपट असेल. ‘जवान’ या हिट चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्याबरोबर हा त्याचा पहिला चित्रपट आहे. अल्लू अर्जुन म्हणाला की, हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना एक नवीन आणि अनोखा अनुभव देईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्लू अर्जुनने केले अ‍ॅटलीचे कौतुक

अ‍ॅटलीबरोबर काम करण्याबद्दल अल्लू अर्जुन म्हणाला, “अ‍ॅटलीने मला सांगितलेली गोष्ट मला खूप आवडली. त्याचे विचार आणि महत्त्वाकांक्षा मला प्रभावित करतात, आमचे विचारदेखील जुळतात.” कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. हा चित्रपट हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्याचप्रमाणे भारतातही सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटामुळे अभिनेत्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.