बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचा भाऊ फैजल खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. फैजल खानने ‘फॅक्ट्री’ या चित्रपटातून दिग्दर्शनातून पदार्पण केले आहे. या चित्रपटात फैजलने मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री रोली रायनने त्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. नुकतंच फैजल खानने हिंदी सिनेसृष्टीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्याने बॉलिवूडमध्ये फक्त सेक्सबद्दल विचार केला जातो, असे धक्कादायक वक्तव्य केले.

फैजल खानने नुकतंच ‘टाईम्स नाऊ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बॉयकॉट बॉलिवूड, बिग बॉस आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींवर त्याचे वैयक्तिक मत मांडले. यावेळी फैजल खानला बॉलिवूडबद्दल तुझे मत काय याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने सडेतोड उत्तर देत बॉलिवूड कलाकारांवर ताशेरे ओढले.

आणखी वाचा : “आम्ही कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी पण तुम्ही…” नागराज मंजुळेंबाबत आमिर खानने केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत

यावेळी तो म्हणाला, “आता सिनेसृष्टीत मोठमोठ्या लोकांच्या विकेट पडताना दिसत आहे. अनेक दिग्गज लोकांमधील गर्व कमी होताना दिसत आहे. सध्या सर्वच वयातील प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपट आवडत आहेत आणि बॉलिवूडमध्ये फक्त त्याचे रिमेक बनताना दिसत आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत हिट झालेल्या अनेक चित्रपटांचे रिमेक आपण बनवले आहेत. त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी चित्रपटात एखाद्या मोठ्या अभिनेत्याला घेतलं आणि तो बनवला की झाले असे त्यांना वाटते. लेखक काहीही काम करत नाही. त्यांची क्रिएटिव्हीटी आणि लिहिण्याची क्षमता संपली आहे. फक्त चित्रपटातील नायक प्रेक्षकांना प्रभावित करतो असे त्यांना वाटते.”

“तसेच आजकाल नायक-नायिकेची प्रतिमा चांगली नाही. ड्रग्ज प्रकरणात लोकांची नावे येत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटातील संवादांशी सामान्य माणूस जोडला जातो. बॉलिवूडचे जीवन भ्रष्ट झाले आहे. ते फक्त चुकीच्या गोष्टींचा विचार करतात. बॉलिवूडमध्ये फक्त सेक्सबद्दल विचार केला जातो. त्याच्या कपड्यांमध्ये आणि चित्रपटातील आशयातही हेच दिसते. बॉलिवूडला आपली प्रतिमा सुधारण्याची गरज आहे”, असेही फैजल खानने म्हटले.

आणखी वाचा : “मी हा सीन करणार नाही…”, उषा नाडकर्णींनी सांगितला ‘पवित्र रिश्ता’च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

दरम्यान, ‘फॅक्ट्री’ हा चित्रपट गेल्यावर्षी ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या आधी फैजलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मेला’,‘चिनार’ ‘दास्तान’ या चित्रपटांमधील त्याची भूमिका चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. त्यासोबतच फैजलने ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातही काम केले आहे. सध्या तो अनेक चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारताना दिसत आहे.