अभिनेते नाना पाटेकर हे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आहेत. नाना पाटेकर यांची भूमिका असलेला व्हॅक्सिन वॉर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नाना पाटेकरांनी या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळीपासून ते आगामी सिनेमा कुठला करणार? त्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने लक्ष वेधलं आहे. स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नाना पाटेकर नेमकं काय काय म्हणाले?

आपण आपल्याला आवडेल ते काम करायचं. तुम्हाला वाटतं जे की जे छान करु शकतो तेच काम करायचं. नाहीतर तुमच्याकडून सरधोपट काम होतं. माझं फार छान होतं किंवा होतच असं नाही. पण मी प्रयत्न करतो. विवेक अग्निहोत्रीला मी विचारलं की या भूमिकेसाठी मलाच का घेतलंस? त्यावर तो मला म्हणाला इंडिया कॅन डू इट हे वाक्य तुम्ही उच्चाराल तेव्हा लोक मानतील. मला त्याचा आनंद वाटला असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. ‘व्हॅक्सिन वॉर’ ही रिसर्च ओरिएंटेंड फिल्म आहे. मी या सिनेमात अभिनय करतोय याचा आनंद आहे असंही नाना पाटेकर म्हणाले.

मृत्यूनंतर लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत

“मला माहित आहे की एक दिवस माझा मृत्यू होईल. माझा मृत्यूवर विश्वास आहे. त्यामुळे मी मला कमाई, प्रसिद्धी, आपल्यालाच सगळं कसं मिळेल? या गोष्टींमध्ये रस उरलेला नाही. जे लोक असा विचार करतात की आम्ही मरणारच नाही ते सगळं साठवत राहतात, आणखी कसं मिळेल याचा विचार करत राहतात. मला माहित आहे की माझ्या मृत्यूनंतर मला १२ मण लाकडं लागणार आहेत. तेवढीच लागणार आहेत. ती माझी अखेरची मालमत्ता असणार आहे. मी माझ्या सिनेमातही हा संवाद वापरला आहे. मैने अपनी लकडी जमाँ कर के रखी है.. मी खरंच लाकडं गोळा करुन ठेवली आहेत. तर मी त्याला म्हणतो, ‘बेटे मैने अपनी लकडी जमा कर रखी है.. और वो सुखी लकडी है. तुम भी गिली लकडी इस्तेमाल मत करना. लोग जमा होंगे..धुआँ आयेगा दोस्त लोग, अगलबगल के लोगोंके आँखमे जाएगा और मरते वक्त गलतफैमी होगी मेरे लिये रो रहें है.’ हे आयुष्याचं वास्तव आहे. मृत्यूनंतर कुणीही तुम्हाला लक्षात ठेवत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भा.रा. तांबे यांच्या कवितेचं उदाहरण

“मराठीत भा. रा. तांबे यांची कविता आहे जन पळभर म्हणतील हाय हाय! लोक थोडे दिवस शोक करतील नंतर विसरुन जातील. ते आवश्यकही आहे. लोक विसरतातच हे वास्तव आहे असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण नंतर माणूस स्वतःची समजूत घालतो. आजही मला वाटतं की माझी आई आहे. मृत्यूनंतर काय होईल तर माझी आणि माझ्या आईची भेट होईल. आम्ही सात भावंडं होतो. त्यातले सहा जण गेले मी राहिलो. आई वडील नाहीत, भाऊ बहिणी नाहीत. त्यामुळे मी आता त्या दुनियेचा झालो आहे. तुम्ही किती पैसे किती जमवणार? आणि इतके पैसे जमवून काय करणार? असाही प्रश्न नाना पाटेकरांनी विचारला.”