Ravi Kishan Reaction on Marathi Hindi Language Controversy : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी-हिंदी हा वाद सुरू आहे. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर काढल्यानंतर हा वाद उफाळून आला. यानंतर राजकीय नेत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी याला विरोध केला; त्यामुळे हे दोन्ही जीआर रद्दही झाले. मात्र मराठी-हिंदी भाषेचा हा वाद अजूनही मिटलेला नाही.

मराठी न बोलणाऱ्या अमराठी लोकांना मारहाण केल्याचे काही व्हिडीओही गेल्या काही दिवसांत समोर आले आहेत. तसंच काहींनी ‘कोणी कितीही सांगितलं, तरी मुंबईत मराठी बोलणार नाही’, असा पवित्राही घेतला. त्यामुळे भाषावादाचा हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. मराठीसह काही बॉलीवूड कलाकारांनी या विषयावर आपापली मतं व्यक्त केली आहेत. अजय देवगण, शिल्पा शेट्टी, आर. माधवन, आशुतोष राणा, किशोरी शहाणे यांनी मराठी-हिंदी या भाषावादाबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

अशातच अभिनेते रवी किशन आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना याप्रकरणी त्यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांचा उल्लेख केला. तसंच मराठा समाज, भोजपुरी समाज आणि सर्वांनी मिळून मुंबईसाठी आपलं प्राण दिलं असल्याचंही म्हटलं.

रवी किशन इन्स्टाग्राम पोस्ट

याबद्दल रवी किशन म्हणाले, “मी मराठी बोलतो, बोलू शकतो. मला खूप छान मराठी बोलता येतं. मी एक मुंबईकर आहे. मी मराठीत ‘मध्यमवर्ग’ नावाचा सिनेमाही केला होता. हे राजकारण आहे. लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत. इथे भोजपुरी समाज गेल्या तीन-चार पिढ्यांपासून राहत आहे. मुंबई या शहराला कोळी आणि पारसी समाजाने वसवलं आहे, तसेच मराठा समाज, भोजपुरी समाज या सर्वांनी मिळून मुंबईसाठी आपले प्राण दिले आहेत. सगळ्यांनी या शहरासाठी आपलं रक्त आणि घाम गाळला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे ते म्हणतात, “अजूनही सगळे एकत्र राहत आहेत. सगळीकडे शांतता आहे, पण महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत. ही निवडणूक खूप मोठी असणार आहे. मला माहीत आहे. मी राजकारणाचा अभ्यास केला आहे; अजूनही करत आहे. संसदेत खूप पुस्तकं आहेत. गेल्या सात वर्षांत मी याबद्दल खूप काही वाचलं आहे. त्यामुळे मी हे सगळं माहिती घेऊनच बोलत आहे.”