अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला असल्याचा आरोप करत आयकर विभागाने सोनू सूदची चौकशी केली होती. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, असंही आयकर विभागाकडून सांगण्यात आलं होतं. यानंतर सोनू सूदने एक पोस्ट शेअर केली आहे. या चौकशीनंतर सोनूने एक स्टेटमेंट जारी केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनूने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी करत काळ सर्व गोष्टींचा उलगडा करेल असं म्हंटलं आहे. ” जेव्हा प्रत्येक भारतीयांचा आशिर्वाद पाठिशी असतो तेव्हा खडतर मार्गावरील प्रवासही सोपा वाटू लागतो” अशा आशयाची पोस्ट लिहित सोनूने स्टेटमेंट जारी केलंय. या स्टेटमेंटमध्ये तो म्हणाला, “आपल्याला स्वत:ची बाजू मांडण्याची गरज नसते. काळ सर्व सांगतो. मी माझ्यापरीने आणि मनापासून प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. याव्यतिरिक्त, अनेक प्रसंगी, मी विविध ब्रॅण्डसना माझ्या कामाची फी गरजुंना दान करण्यासाठी प्रोत्साहित केलंय. काही पाहूण्यामुळे मी गेल्या चार दिवसांपासून व्यस्त असल्याने तुमच्या सेवेत येऊ शकलो नाही. आता मी पुन्हा आलो आहे. माणुसकीसाठी माझी सेवा अशीच सुरु राहिल.” असं म्हणत सोनूने दोन सुंदर ओळी लिहिल्या आहेत. “कर भला, हो भला, अंत भले का भला. जय हिंद” असं सोनू त्याच्या निवेदनात म्हणाला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सूदला पाठिंबा दिला आहे. “सोनू सूद तुम्हा लाखो भारतीयांचे हिरो आहात” असं ट्वीट करत अरविंद केजरीवाल यांनी सोनूचं कौतुक केलंय.

काय आहेत सोनू सूदवर आरोप?

सोनुवरील आरोपांनुसार, करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ना-नफा सूद चॅरिटी फाउंडेशनने यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १.९ कोटी रुपये त्याने लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.

“लखनऊमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातीस रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सोनुने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याठिकणी कर चोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. लखनऊच्या ग्रूपने बोगस बिलांच्या आधारे निधी वळवून गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत अशा ६५ कोटींच्या बोगस कराराचे पुरावे सापडले असून १.८ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे,” असंही आयकर विभागाने म्हटलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sonu sood release statement after income tax survey kpw
First published on: 20-09-2021 at 11:59 IST