Vishal & Sai Dhanshika Wedding : अनेक बॉलीवूड, दाक्षिणात्य, मराठी कलाकारांनी २०२५ मध्ये लग्न करून संसार थाटले. या यादीत आता सुप्रसिद्ध दाक्षिणात्य स्टारच्या नावाचा समावेश झाला आहे. अभिनेता विशाल कृष्णा लवकरच लग्न करणार आहे. त्याने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. विशाल कृष्णा अभिनेत्री सई धनशिकाशी लग्न करणार आहे. या जोडप्याने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
विशाल कृष्णा व साई धनशिका २९ ऑगस्ट २०२५ रोजी लग्न करणार आहेत. याच दिवशी विशालचा वाढदिवस असतो. विशालच्या वाढदिवशीच त्यांनी लग्न करून हा दिवस आणखी खास करायचा, असं ठरवलं आहे. दरम्यान, विशाल व धनशिकाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांची जोरदार चर्चा होत आहे. दोघांच्या वयातील फरकाबाबतही सोशल मीडियावर बोललं जातंय. अभिनेत्री साई धनशिका ३५ वर्षांची आहे, तर विशाल ४७ वर्षांचा आहे. ती विशाल कृष्णापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. विशाल लग्नाच्या दिवशी ४८ वर्षांचा होईल.
सोमवारी एका कार्यक्रमात साई व विशालने त्यांच्या लग्नाची घोषणा केली. दोघेही १५ वर्षांपासून मित्र आहेत आणि बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. “विशाल आणि मी २९ ऑगस्ट रोजी लग्न करणार आहोत. मी विशालला गेल्या १५ वर्षांपासून ओळखते. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा तो माझ्याशी आदराने वागायचा. मी खूप अडचणीत असताना तो माझ्या घरी यायचा, मला पाठिंबा द्यायचा. आजपर्यंत कोणताही हिरो माझ्या घरी आला नाही. त्याच्या या कृतीने माझं मन जिंकलं,” असं साई धनशिका म्हणाली.

विशाल म्हणाला, “माझे लग्न ठरले आहे. मला मनासारखी मुलगी भेटली आहे. धनशिकाचे वडील इथे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने मी तिची ओळख करून देत आहे. मी धनशिकाशी लग्न करणार आहे. ती एक अप्रतिम व्यक्ती आहे.”
कोण आहे साई धनशिका?
साई धनशिका ही तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने १६ व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. २०१६ मध्ये, ती ‘कबाली’ चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
साई धनशिकाने करिअरमध्ये ‘पेरनमई’, ‘मांजा वेलू’ व ‘निल गवानी सेलाथे’ तसेच ‘अरावान’ व ‘परदेसी’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तमिळबरोबरच धनशिकाने तेलुगू चित्रपटही केले आहेत. ‘शिकारु’, ‘अंतिया तीर’ व ‘दक्षिणा’ हे तिचे लोकप्रिय तेलुगू चित्रपट आहेत.