जाहिरात क्षेत्रांत अजूनही पुरुष कलाकारांच्या पावपट मोबदला
सातासमुद्रापारच्या हॉलीवूड चित्रपटांत आपल्या कलेचा ठसा उमटवल्यानंतर आणि १०० कोटींची कमाई करणाऱ्या बॉलीवूडपटांतील भागीदार बनूनही हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकांची कमाई आजही पुरुष कलाकारांच्या तुलनेत कमी आहे. केवळ चित्रपटच नव्हे, तर जाहिरात क्षेत्रांतही बॉलीवूडच्या आघाडीच्या नायिकांना एका जाहिरातीसाठी दीड ते दोन कोटी मिळतात, तर दुसरीकडे, सलमान, आमीर, रणबीर या अभिनेत्यांना मात्र एका जाहिरातीसाठी आठ कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजण्याची तयारी कंपन्या दाखवतात.
सध्या व्हिन डिझेलबरोबरच्या ‘एक्सएक्सएक्स’ या हॉलीवूडपटासाठी चर्चेत असलेल्या दीपिकाने एका जाहिरातीसाठी साडेसात ते आठ कोटींची मागणी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बॉलीवूडमध्ये यशस्वी कारकीर्द आणि हॉलीवूडपटांच्या जोरावर दीपिकाने केलेली मागणी सार्थ असूनही तिने मागितलेल्या मानधनाच्या आकडय़ावर खरे तर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर जाहिरातींसाठीही नायिकांना वाढती मागणी असूनही त्यांना हवे ते मानधन मात्र मिळत नसल्याचे चित्र आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये दीपिका आणि प्रियांका चोप्रा या दोघीही यशस्वी नायिका मानल्या जातात. या दोघींच्याही चित्रपटांनी तिकीटबारीवर १०० कोटींची कमाई केली आहे. शिवाय, हॉलीवूडपटांमुळे त्यांची स्वत:ची आंतरराष्ट्रीय ओळखही निर्माण झाली आहे. मात्र असे असूनही एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी दीपिकाला दर दिवसासाठी दीड ते दोन कोटींचे मानधन मिळते. मात्र, या वेळी दीपिकाने एका जाहिरातीसाठी तीन दिवसांचे ८ कोटी रुपये मागितल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सलमान खान, आमीर खान, रणबीर कपूर हे अभिनेते एका जाहिरातीसाठी आठ कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजून घेत असताना, अभिनेत्रींच्या जाहिरात मानधनाचा आकडा दोन कोटींच्या पलीकडे जाताना दिसत नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांनी तर ‘एलजी’ कंपनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सहा कोटींचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. जाहिरात क्षेत्रात दीपिकापाठोपाठ ऐश्वर्या राय-बच्चनला अधिक मागणी आहे. ऐश्वर्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘कान’साठी तिचे प्रतिनिधित्व असो नाही तर ‘लॉरिएल’सारख्या ब्रँडशी तिचे इतके वर्ष जोडले जाणे असेल, यामुळे ऐश्वर्याला अजूनही जाहिरातींसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांची पसंती मिळते. अगदी कमी चित्रपट करूनही ऐश्वर्याला जाहिरातींसाठी दीड ते पावणेदोन कोटींचे मानधन मिळते आहे. विशेष म्हणजे, हॉलीवूडमध्ये अभिनयासोबतच गायनानेही स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या प्रियांका चोप्रा हिला एक ते दीड कोटीच्या आसपास मानधन मिळते.
दुसऱ्या फळीतील नायिकांमध्ये अलिया भट आणि श्रद्धा कपूर यांनी आघाडी घेतली असून अलिया सध्या १ कोटी रुपये घेते. सोनम कपूरचाही आकडा तेवढाच आहे. श्रद्धाला ६० ते ७० लाख रुपये मिळतात. अनुष्का शर्मानेही जाहिरातींसाठी मानधनाचा आकडा वाढवलेला नसल्याने तीही ७० ते ८० लाख रुपये घेते.

कंगनाचा स्वभाव आडवा
कंपन्यांना नेहमीच कुठल्याही वादविवादात नसलेले आणि चांगल्या चेहऱ्यांचे कलाकार हवे असतात. त्यामुळे कंगना राणावत लोकप्रिय असूनही तिच्या सतत भांडत राहण्यामुळे तिला ५० लाख रुपये एवढे कमी मानधन मिळत असल्याचे समजते.

‘आंतरराष्ट्रीय ओळख पथ्यावर’
ऐश्वर्यासारख्या अभिनेत्रीला जाहिरातींसाठी जास्त मागणी असते. कारण त्यांच्या चेहऱ्याला आंतरराष्ट्रीय ओळख आहे. बऱ्याचशा कंपन्या या परदेशातील असल्याने त्यांना जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या कलाकाराचा चेहरा हवा असतो. जो एकाच वेळी भारतीय लोकांनाही आपलासा वाटेल आणि परदेशातही लोकांना नवीन असणार नाही, अशाच बॉलीवूड कलाकारांची निवड केली जाते, असे ट्रेड विश्लेषक गिरीश वानखेडे यांनी सांगितले.