Actress Bhavana Ramanna Embraces Motherhood At Her 40s : दाक्षिणात्य अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना भावना रामण्णा सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तिनं नुकतीच दिलेली मुलाखत. भावना रामण्णा लवकरच आई होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेत्री अविवाहित असून, तिनं वयाच्या चाळिशीत आई होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सध्या ती चर्चेचा विषय ठरत असल्याचं दिसतं. अभिनेत्रीनं मुलाखतीमध्ये यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
भावना रामण्णा हिनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी तिनं मातृत्वाबद्दलची तिची मतं, तसेच कधीही लग्न न केल्याबद्दलही सांगितलं आहे. भावना म्हणाली, “मला लग्न ही संकल्पना कधी फारशी पटली नाही. त्यामुळे मी वेगळे मार्ग निवडले. आपल्याकडे बराच काळ एकटी स्त्री किंवा अविवाहित महिलेला मातृत्व अनुभवण्याची परवानगी नव्हती; पण आता गोष्टी बदलल्या आहेत.”
भावना याबद्दल पुढे म्हणाली, “आता यामध्ये सकारात्मक बदल झाले असल्यानं मी लगेचच आयव्हीएफच्या (IVF) माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी डॉक्टरांना याबाबत सांगत असे आणि त्यांना कळायचं की, मी अविवाहित आहे आणि माझ्या मुलांचं एकल पालकत्व करणार आहे तेव्हा अनेक डॉक्टरांच्या अनपेक्षित प्रतिक्रिया मला मिळायच्या”.
भावना आता सहा महिन्यांची गरोदर असून, ती दोन जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. यावेळी अभिनेत्रीला तिच्या डॉक्टरांकडून कशी मदत झाली आणि त्यांच्यामुळे हा प्रवास तिच्यासाठी कसा सोपा झाला याबाबत तिनं सांगितलं आहे. ती म्हणाली, “माझ्या डॉक्टरांनी मला यासाठी खूप पाठिंबा दिला. आणि या प्रवासात माझी खूप मदत केली”.
भावना पुढे तिच्या मुलांच्या भविष्याबाबत म्हणाली, “मला एकल पालकत्व काय असतं याची पूर्ण कल्पना आहे आणि मी त्यासाठी तयार आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की, माझ्या मुलांना पुढे जाऊन काही गोष्टींना सामोरं जावं लागेल; पण मी त्यासाठीही तयार आहे. मी पुरुषांचा तिरस्कार करते वगैरे असं काही नाहीये आणि माझं असंही म्हणणं नाहीये की, पुरुषांशिवाय आयुष्य जगणं हा योग्य मार्ग आहे”. अभिनेत्री पुढे मुलांबद्दल म्हणाली, मी माझ्या मुलांना आयुष्य काय असतं? प्रेम, जबाबदारी, सत्याच्या मार्गानें चालणं या गोष्टी शिकवणार आहे”.
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं १९९६ मध्ये ‘मारिबाळे’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यासह तिनं ‘नी मुदिदा मल्लिगे’, ‘क्षमा’, ‘भागीरथी’, ‘ओटा’, ‘भगवान’, ‘शांती’, ‘फॅमिली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भावनाला अभिनयासह नृत्याचीही आवड आहे.