नाट्यगृहातील स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि अस्वच्छता यावर अनेक मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. परंतु, ही परिस्थिती सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमध्येदेखील पाहायला मिळते. त्यामुळेच अभिनेत्री हेमांगी कवी हिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयाचा योग्य पद्धतीने वापर न करणाऱ्यावर हेमांगीने टिकास्त्र डागलं आहे. शौचालये अस्वच्छ ठेवली तर त्यामुळे महिलांना किती समस्यांचा सामना करावा लागतो हे तिने तिच्या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
“अनेक कामाची ठिकाणी western toilets (commode) असतात. त्यातच बऱ्याचदा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी common toilets असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा स्त्रियांची अडचण येते. कारण बरेच पुरूष या पाश्चात्य शौचालयाचा योग्य वापर करत नसल्यामुळे स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा महिलांना मासिक पाळीत या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे पाश्चात्य शौचालय कसे वापरावे याचं ज्ञान मुलांना लहान असतानाच शाळेत किंवा घरात दिले पाहिजे”, असं हेमांगी म्हणाली.
पुढे ती म्हणते, “पुरुष मूत्र विसर्जन करताना commode च्या ring वर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या commode वर त्या कशा बसत असतील? बसत नसतील तर मग कशा manage करत असतील? मासिक पाळी ( #periods, menustral cycle) च्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का? होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! #Commode कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही hygiene, health शी असतो!”
दरम्यान, या पोस्टमध्ये हेमांगीने अनेक गोष्टींवर थेट भाष्य केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलची चर्चिली जात आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. तसंच स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेविषयी तिने स्पष्टपणे केलेल्या भाष्यामुळे तिचं कौतुकही केलं जात आहे.

