दाक्षिणात्य अभिनेत्री जसीला परवीनने एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने मारहाण केली, पोटात लाथा मारल्या असं जसीलाने म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिने एक्स बॉयफ्रेंडने केलेल्या छळाबद्दल सांगितलं आहे.
एक्स बॉयफ्रेंडने मारलं होतं, त्या जखमांचे व्रणही तिने दाखवले आहेत. ही घटना केव्हा घडली होती, असं एका चाहत्याने विचारलं. त्यावर न्यू इयरच्या पार्टीनंतर हा प्रसंग घडला होता, असा खुलासा जसीलाने केला.
पोटावर लाथा मारल्या – जसीला
जसीलाने लिहिलं, “३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पार्टीनंतर माझा व डॉन थॉमसचा वाद झाला. त्यानंतर त्याने माझ्या पोटात दोनदा लाथ मारली, माझ्या चेहऱ्यावर त्याने मारलं, त्यामुळे आता मला प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. सुरुवातीला तो मला रुग्णालयात नेण्यास नकार देत होता, पण नंतर मला खोट बोलावं लागलं, तेव्हा त्याने मला रुग्णालयात नेलं. रुग्णालयात गेल्यानंतर तो खोटं बोलला. काही दिवसांनी मी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि खटला अजूनही सुरू आहे.”

मी स्वतःला आरशात ओळखूही शकत नव्हते – जसीला
पोस्टमध्ये जसीलाने तिच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलली. तिचे १० किलो वजन कमी झाले होते. “मला जेवता येत नव्हते, मी झोपू शकत नव्हते आणि आरशात स्वतःला ओळखूही शकत नव्हते. शस्त्रक्रिया केल्याने माझ्या चेहऱ्यावर टाके पडले, पण कोणी मला बोलण्यापासून रोखू शकलं नाही. त्याला माझ्या आयुष्यात परत यायचं आहे, जणू काही काहीही झालंच नाही. मी त्याला शेवटची संधी देखील दिली होती. मी त्याला माफी माग असं सांगितलं, जेणेकरून हा चॅप्टर संपुष्टात येईल, पण प्रामाणिकपणा दाखवण्याऐवजी न्यायालयाचा पर्याय निवडला,” असं जसीला म्हणाली.