scorecardresearch

कीर्ती सुरेशने ‘दसरा’ चित्रपटाच्या टीमला वाटली ७५ लाखांची सोन्याची नाणी; नेमकं कारण काय?

‘दसरा’ हा मूळ तेलुगू चित्रपट आहे, पण तो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे

keerthy suresh
फोटो : सोशल मीडिया

अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच दाक्षिणात्य अभिनेता नानीसह ‘दसरा’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नानी आणि कीर्ती सुरेश यांच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कीर्ती सुरेश ही सध्या या चित्रपटात केलेल्या कामाबद्दल इतकी खूश आहे की तिने चित्रपटाच्या सेटवर प्रत्येकी १० ग्रॅमची १३० सोन्याची नाणी युनिट सदस्यांना वाटली आहेत.

‘आयएएनएस’च्या वृत्तानुसार, कीर्ती सुरेशला वाटले की तिने ‘दसरा’ मध्ये तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला आहे आणि सेटवरील लोकांसाठी काहीतरी खास करावे असं तिला वाटल्याने तिने सोन्याची नाणी वाटल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नाही तर चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कीर्ती सुरेश भावूकही झाली होती. मग तिने चित्रपटाच्या टीमला सोन्याची नाणी वाटण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : कन्नड अभिनेता चेतन कुमारला अटक; हिंदू धर्माबद्दल केलेलं ‘हे’ वादग्रस्त ट्वीट ठरलं कारण

वृत्तानुसार, कीर्ती सुरेशने चित्रपटाच्या टीमला ७० ते ७५ लाखांची सोन्याची नाणी वाटली. ‘दसरा’ हा मूळ तेलुगू चित्रपट आहे, पण तो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. कीर्ती सुरेश या चित्रपटात वेनेलाच्या भूमिकेत आहे. श्रीकांत ओडेला दिग्दर्शित हा एक अॅक्शन अॅडव्हेंचर ड्रामा आहे.

चित्रपटाची कथा तेलंगणातील गोदावरीखानीजवळील सिंगरेनी कोळसा खाणीभोवती फिरते. ३० मार्च रोजी हा चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. कीर्ती सुरेशने ज्या प्रकारे त्यांच्या चित्रपटाच्या टीमला सोन्याची नाणी वाटली असंच काहीसं दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणनेही केलं होतं. त्याने ‘आरआरआर’च्या टीमला ११.६ ग्रॅम सोन्याची नाणी भेट दिली होती. एवढेच नाही तर राम चरणने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला हैदराबाद येथील त्याच्या घरी न्याहारीसाठी आमंत्रणही दिले होते. चित्रपटाच्या सेटवर सोन्याची नाणी वाटणे ही बहुतेक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रथा आहे असाच आपला समज होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 16:22 IST

संबंधित बातम्या