Actress Navya Nair fined Rs 1.14 lakh at Melbourne airport: ‘या’ अभिनेत्रीबरोबर ऑस्ट्रेलियात काय घडलं? घ्या जाणून… फुलांचा गजरा केसात माळणे हे सामान्य गोष्ट आहे.

पूर्वीच्या काळी महिला बहुतांश वेळा विविध फुले, त्याचा गजरा केसात माळत असत. आताही सणांच्या दिवशी तयार होताना स्त्रिया केसात गजरा माळतात. विविध भागांत विविध फुले केसात घातली जातात.

लोकप्रिय अभिनेत्रीला भरावा लागला १ लाखाचा दंड

आता मात्र एका अभिनेत्रीला केसात चमेलीचा गजरा माळणे महागात पडले आहे. नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊ… मल्याळम अभिनेत्री नव्या नायर नुकतीच ऑस्ट्रेलियाला गेली होती. मल्याळी असोसिएशन ऑफ व्हिक्टोरियाने आयोजित केलेल्या ओणमच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी ती गेली होती. यावेळी तिने केसात १५ सेंटीमीटर लांब चमेलीचा गजरा माळला होता. भारतात ही गोष्ट सामान्य असली तरी इतर काही देशात मात्र ही बाब सामान्य नाही.

अभिनेत्रीने एका सार्वजनिक कार्यक्रमात याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “मी इथे येण्यापूर्वी, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी चमेलीचा विकत घेतला. त्यांनी तो दोन भागांमध्ये कापून मला दिला. त्यांनी मला कोचीहून सिंगापूरला जाताना केसात एक घालण्यास सांगितले. कारण मी पोहोचेपर्यंत ती फुले कोमेजून गेली असती आणि गजऱ्याचा दुसरा माझ्या बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. जेणेकरून मी सिंगापूरहून पुढील प्रवासात घालू शकेन. तो गजरा मी माझ्या बॅगमध्ये ठेवला होता.”

“मी जे केले ते कायद्याच्या विरुद्ध होते. माझ्याकडून नकळत चूक झाली. १५ सेमी चमेलीचा गजरा आणल्याबद्दल अधिकाऱ्यांनी मला १,९८० ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच १.१४ लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. मी ती चूक जाणूनबुजून केली नाही. पण चूक ही चूक असते. २८ दिवसांच्या आत दंड भरावा लागेल, असे मला तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले”, असे म्हणत अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला.

हा प्रकार घडण्यापूर्वी तिने विमानातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत ऑस्टेलियाला जाण्याबाबत उत्सुक असल्याचे म्हटले होते.

आता चमेलीच्या गजऱ्यामुळे अभिनेत्रीला का दंड भरावा लागला? तर ऑस्ट्रेलियाचे फुले आणि वनस्पतींबाबत काही कडक नियम आहेत. त्या नियमांचे पालन करणे तेथील नागरिक आणि इतर देशातून तिथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक आहेत. गल्फ न्यूज नुसार, ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने काही वनस्पती, बिया आणि फुलांची यादी तयार केली आहे. ती फुले, बिया किंवा वनस्पती परवानगीशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाऊ शकत नाही.

मनोरमा न्यूज नुसार, काही वनस्पती किंवा फुलांमुळे आजार पसरू शकतात. तसेच, त्याचा ऑस्ट्रेलियातील परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फुले किंवा इतर वनस्पती परवानगीशिवाय घेऊन जाणे, अवैध आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडमधील ऑकलंड विमानतळावर घाणेरडे बूट घेऊन गेल्याबद्दल क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना सुमारे १०० डॉलर इतका दंड ठोठावण्यात आला होता.

दरम्यान, नव्या नायरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी दोन वेळा केरळ राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित केले आहे.