अभिनेत्री पूजा हेगडेनं हैदराबादमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्याच्या चर्चा होत्या. मात्र या सर्व चर्चा खोट्या असून त्यात अजिबात तथ्य नसल्याचं पूजाच्या मॅनेजरने स्पष्ट केलं आहे. नुकताच पूजाचा ‘महर्षी’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी हैदराबादमध्ये आयोजिक एका कार्यक्रमातून हॉटेलकडे जाताना पूजाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आणि पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं, अशा अफवा पसरल्या होत्या.
‘कार्यक्रमानंतर पूजाला विमानतळावर जाण्यासाठी चित्रपटाच्या टीमकडून गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे अनोळखी शहरात ड्राइव्हिंग करण्याचं धैर्य पूजा करणारच नाही. या बातमीत तथ्य असतं तर तिच्याविरोधात पोलीस तक्रार नक्कीच असती. पण असं काहीच झालेलं नाही,’ असं तिच्या मॅनेजरने सांगितलं. पूजा हेगडेच्या विरोधातील हे वृत्त बनावट आहे. खोटी बातमी छापणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असंही ते म्हणाले.
पूजाने आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटात हृतिक रोशनसोबत भूमिका साकारली होती. याशिवाय तिने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.