Seema Deo last rites: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता.

‘आनंद’ या सिनेमात त्यांनी केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीवरच शोककळा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : ‘चांद्रयान ३’वरील चित्रपटाची घोषणा; ‘मिशन मंगल’च्या दिग्दर्शकाचं मोठं विधान; म्हणाले, “ही संधी…”

आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार सुरू झाले असून बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन सीमा देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी, अभिनेत्री नेहा पेंडसे, संगीतकार व गायक अजय गोगावले यांनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली. सीमा देव यांचे सुपुत्र अजिंक्य देव आणि अभिनय देव यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून काम केलं. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.