काही दिवसांपुर्वी राज्यात मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. राज्य सरकारने शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिर्वाय केली होती; मात्र या निर्णयाला प्रचंड विरोध झाला आणि मग सरकारने यासंबंधित जीआर रद्द केले. दरम्यान, या सगळ्या प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी भाषिक वादही झाले. या मराठी-हिंदी भाषिक वादाबद्दल राजकीय तसंच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी मराठी भाषेचा आग्रह कायम ठेवत हिंदी सक्तीला विरोध दर्शवला होता. अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीसुद्धा ‘महाराष्ट्रात फक्त मराठीच’ ही मागणी लावून धरली होती. अशातच आता या भाषिक मुद्द्यावर अभिनेत्री श्रुती मराठेनेसुद्धा तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने मराठीसह तामिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीतही काम केलं आहे. या इंडस्ट्रीमधील अनुभवाबद्दलही आणि मराठी भाषेबद्दल ती व्यक्त झाली.

Isapniti Entertainment ला दिलेल्या मुलाखतीत श्रुती असं म्हणाली, “मराठी भाषेचा आता जो वाद सुरू आहे. त्याबद्दल मला असं वाटतं की, जे आज महाराष्ट्रात आले आहेत; त्यांच्याकडून उद्या मराठी बोलाच ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण मीसुद्धा हैदराबाद किंवा चेन्नईला जाते, तेव्हा त्यांची अपेक्षा नसते की, मी पटापट तेलुगू किंवा तामिळ बोलावं. त्यांचं म्हणणं असतं की, तू ती भाषा बोलण्याचा प्रयत्न तरी करत आहेस का? तेव्हा मी त्यांना म्हणते की, ‘हो मी प्रयत्न करतेय’. कारण तेव्हा माझ्याकडे पर्याय नसतो. मला चित्रपटात काम करायचं आहे; त्यामुळे माझ्याकडे तो पर्यायच नाही.”

२०-२५ वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी नाही शिकलात? हे मला खटकतं : श्रुती मराठे

यानंतर ती म्हणते, “महाराष्ट्रात मला इतकी लोक माहीत आहेत आणि माझ्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे मराठी नाहीत. पण खूप गर्वाने सांगतात की, आम्ही १५-२० वर्षे महाराष्ट्रात राहतो, ‘हम को नही आती मराठी…’ मला याचा राग आहे. मराठी येत नाही याचा हा कुठला अभिमान आहे? तुम्ही २०-२५ वर्षे महाराष्ट्रात राहताय, तुमच्या आजूबाजूला इतकी मराठी माणसं आहेत, कदाचित तुमच्या घरी काम करणारी सगळी माणसं मराठी असतील; तरीसुद्धा तुम्ही २०-२५ वर्षांत मराठी शिकला नाहीत? मला याचा प्रॉब्लेम आहे आणि हे मला खटकतं.”

या राज्यात राहूनसुद्धा मराठी भाषा येत नसेल तर त्याची लाज वाटली पाहिजे : श्रुती मराठे

यानंतर श्रुती म्हणते, “आता ज्यापद्धतीने मराठी भाषेचा जोर केला जात आहे; ती पद्धत कदाचित चुकीची असेल… तिथे जाऊन लोकांना मारत आहेत आणि दंगे वगैरे या सगळ्या गोष्टी होत आहेत. ती पद्धत चुकीची आहे; पण त्यामागचा हेतू अगदीच योग्य आहे. कारण १५-२० वर्षे तुम्ही या राज्यात राहूनसुद्धा तुम्हाला त्या राज्याची भाषा येत नसेल तर त्याची लाज वाटली पाहिजे. आम्ही ही अपेक्षा करतच नाही की, तुम्ही काल आला आहात आणि उद्यापासूनच मराठी बोला. मी तर दोन, तीन, चार वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षे अपेक्षा करत नाही. कारण मराठी बोलायला तितकी वर्षे लागतीलच. पण तुम्ही प्रयत्न करत आहात का? किंवा आम्ही म्हणत नाही की, तुम्ही अस्खलित मराठी बोला. कारण ती तुमची मातृभाषा नाही आणि तुम्ही ती भाषा ऐकून ऐकून बोलताय. त्यामुळे ती अस्खलित असण्याची अपेक्षा नाही; पण तुम्ही प्रयत्न तरी केला पाहिजे.”

भाषा बोलत नाही आणि ज्या गर्वाने सांगतात की, शिकणार नाही; त्याचा राग येतो : श्रुती मराठे

यापुढे ती म्हणाली, “तुम्ही ती भाषा जाणीवपूर्वक बोलत नाही आणि ज्यापद्धतीने गुंडगिरी सुरू आहे आणि ज्या गर्वाने सांगतात की, ‘मराठी शिकणार नाही’ त्याचा राग येतो. मुंबईसारख्या शहरात अनेक राज्यामधून अनेक लोक येतात आणि काम करतात. मी त्यांना विचारते की, तुम्हाला हिंदी येतं का? की मराठी येतं? जेव्हा ते सांगतात की हिंदी येतं तेव्हा मी हिंदीत बोलते. माझं असं नाही की, तुला मराठी येत नाही; तर आता मी मराठीतच बोलणार. तुला येत नसेल तर तुझा प्रॉब्लेम… हे नाही करायचंय… हा मूर्खपणा आहे. पण समोरचा जर ‘मॅडम हमको मराठी नही आती; आपको हिंदीही बोलना पडेगा’ असं बोलला तर मग मी मराठीतच बोलणार. कारण हा अहंकार आहे आणि मला त्याचा प्रॉब्लेम आहे.”

यापुढे श्रुतीने तिचा दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अनुभव सांगताना असं म्हटलं, “मी तेलुगू आणि तामिळ इंडस्ट्रीत काम केलं आहे; तर त्यांना कधी कधी इंग्रजी येत नाही आणि हिंदीही येत नाही. कदाचित दिग्दर्शक आणि बाकीच्या कलाकारांना इंग्रजी येत असेल; पण जे क्रु मेंबर्स असतात, त्यांना हिंदी येत नाही आणि इंग्रजीसुद्धा तोडकं-मोडकं येत असतं. त्यांचं म्हणणं असतं की, तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत आला आहात. आम्ही तुम्हाला बोलावलं नाही. तुमची इच्छा आहे ना… मग थोडे तरी कष्ट घ्या… तमिळ येत नसेल तर आम्ही संवादच साधणार नाही, असं ते म्हणत नाहीत. तर तेव्हा मीसुद्धा इंग्रजी आणि तामिळ भाषा बोलून संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे मला वाटतं की, हे दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे. ते सांगतात की, तू थोडं तमिळ शिक; आम्ही थोडं इंग्रजी शिकतो. आपण करूयात… पण तू शिकलं पाहिजेस.”