कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुनीत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते आयसीयूमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. पुनीत यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुनीत यांना आज दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवत असून त्याच्यावर उपचार करत आहेत. पुनीत यांच्या आरोग्याविषयीची अधिकृत अपडेट लवकरच हॉस्पिटलद्वारे शेअर केले जाईल, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच अनेक चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. अनेकांनी ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ट्वीटवर तसेच सोशल मीडियावर पुनीत राजकुमार असा हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुनीत राजकुमार यांची माहिती

पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. त्याने आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.