‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, येऊ कशी तशी मी नांदायला’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar). मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून तिनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री आपल्या कामाबद्दलची माहिती शेअर करत असते. तसंच खासगी माहितीही देत असते.

अशातच अभिनेत्री सोनाली खरेशी साधलेल्या संवादात अदितीने तिला झालेल्या आजाराबद्दल सांगितले आहे. सोनाली खरेबरोबरच्या संवादात अदितीने तिला झालेल्या ट्युमरबद्दलची माहिती दिली आहे. ‘World Of Wellness with Sonali Khare’ मध्ये अदितीने तिला झालेल्या ट्युमरबद्दल सांगितलं आहे. यावेळी सोनालीने तिला थायरॉईडबद्दल विचारले. तसंच यातून ती बाहेर कशी आली? या आजाराशी तिने कसा सामना केला? याबद्दलही विचारले तेव्हा अदितीने तिच्या ट्युमर व थायरॉईडबद्दल सांगितलं.

याबद्दल अदितीने असं म्हटलं आहे की, “मला ट्यूमर झाला होता. त्याची शस्त्रक्रिया झाली होती. तर त्याच्या मागे थायरॉईडची ग्लॅंड कापली गेली. तेव्हापासून थायरॉईड सुरू झाला. तेव्हा माझा आवाजही गेला होता. हायपोथायरॉईडमध्ये तुमचं वजन पटकन वाढतं आणि सूज येते. त्यामुळे मला वर्षाचे ३६५ दिवस मी काय खाते? हे बघावं लागतं. आठ दिवस मी काही खाल्लं नाही तर फुगते. त्यामुळे मला सकाळी होणारे कपडे कधी कधी संध्याकाळी होत नाहीत. आता हे लोकांना खोटं वाटेल. पण ज्यांनी ज्यांनी माझ्या वेशभूषेचं काम केलं आहे तेच म्हणायचे की, ताई काल कपडे होत नव्हते; पण आज सैल होत आहेत. किंवा अगदी काल कपडे सैल होत होते; पण आता होतच नाहीत.”

यापुढे अदितीने असं म्हटलं आहे, “मला माझ्या आहाराकडे रोज बघावं लागतं. पण कधी कधी याचा कंटाळा येतो. त्यामुळे थोडे दिवस हे बंद करू, असं वाटतं. म्हणजे आपल्याला कसाऱ्याला जायचं असेल आणि आपण कर्जतच्या ट्रेनमध्ये आलो किंवा कर्जतच्या ट्रेनमधून पुन्हा कसाराच्या ट्रेनमध्ये यायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ या सगळ्यासाठी लागतो. तसं आहे हे… पण आता ठीक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदिती झी मराठी वहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. या मालिकेबरोबरच तिने ‘हम बने तुम बने’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘लक्ष्य’ मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकांव्यतिरिक्त तिने ‘उलाढाल’, ‘नवरा माझा भवरा’, ‘नाथा पुरे आता’ अशा अनेक चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.