बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी(१० जानेवारी) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा अजयच्या करिअरमधील १०० वा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि काजोल तब्बल १० वर्षांनी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका मुलाखतीत अजयने अभिनय सोडल्यानंतर कोणतं काम करणार हे सांगितलं.
एका मुलाखतीमध्ये अभिनय सोडल्यानंतर पुढे काय करणार असा प्रश्न अजयला विचारण्यात आला होता. त्यावर अजयने त्याला निर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं सांगितलं.
“एका कलाकाराने कोणत्या वयापर्यंत काम करावं हे मी चांगल्या प्रकारे जाणतो. काही वर्षांनंतर मला कोणत्याही चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे मला सहकलाकाराची वैगरे भूमिका साकारावी लागेल. त्यामुळेच माझं लक्ष निर्मिती क्षेत्रावर केंद्रित करायचा विचार आहे. कलाक्षेत्रामध्ये प्रत्येकाला लाइमलाइटमध्ये राहण्याची सवय झालेली असते. मात्र मला ही सवय अंगवळणी पडून घ्यायची नाही. तसंच कोणी मला नाकारण्यापेक्षी मी वेळीच या क्षेत्रातून निवृत्ती घेईन”, असं अजयने सांगितलं.
वाचा : Chhapaak Movie Review : काळजाला भिडणारी ‘रिअल स्टोरी’
दरम्यान, ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी जवळपास ४ वर्ष मेहनत घेतली आहे. त्यानंतर हा चित्रपट पडद्यावर साकारण्यात येणार आहे. ‘तान्हाजी’मधून शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे. यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांसोबतच बरेच कलाकार भूमिका साकारत आहेत. तसंच अजय देवगण प्रोडक्शनचा हा थ्रीडी चित्रपट असून त्याचा हा १०० वा चित्रपट आहे.