दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता अक्षय कुमारनं साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षयनं ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. अक्षय भूमिका साकारत असलेल्या हाऊसफुल ४ चा दिग्दर्शक साजिद खान आणि याच चित्रपटात काम करणाऱ्या नाना पाटेकर या दोघांवरही लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप आहेत.
#MeToo: ‘साजिद खान नको तिथे स्पर्श करायला लावायचा’
मनोरंजन विश्वात काम करणारी महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी साजिदवर केलेल्या गंभीर आरोपांची दखल अक्षयनं घेत चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘ मी देशाबाहेर होतो. परतल्यानंतर मला काही अस्वस्थ करून टाकणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या. म्हणूनच मी हाऊसफुल ४च्या निर्मात्यांना चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे अशा प्रकरणात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ असं अक्षयनं ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.
— Akshay Kumar (@akshaykumar) October 12, 2018
तर साजिदनं ट्विट करत हाऊसफुल ४ चं दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबावरदेखील दबाव वाढत आहे. मी आता नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुल 4 च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत आहे. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत ते खोटे असल्याचं मी सिद्ध करेनच. सत्य लोकांना लवकरच कळेल. पण तोपर्यंत माझ्याविषयी कोणतंही मत तयार करून गैरसमज करू नका’ असं साजिदनं ट्विट करत म्हटलं आहे.
— Sajid Khan (@SimplySajidK) October 12, 2018
यापूर्वी तनुश्री दत्तानं अक्षय कुमारनं नाना पाटेकर सारख्या महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्या व्यक्तींसोबत काम करणं थांबवलं पाहिजे असंही म्हटलं होतं. अक्षयपूर्वी आमिर खान यानंदेखील दिग्दर्शक सुभाष कपूर सोबत काम करायला नकार दिला. सुभाष कपूर आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मोगुल’ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. पण त्यांच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर आमिरनं त्यांच्यासोबत काम करायला नकार दिला आहे.