अहान पांडे त्याचा पहिला चित्रपट ‘सैयारा’मुळे स्टार झाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. अहान ‘सैयारा’ सिनेमाआधी सोशल मीडियावर रिल्स व्हिडीओमुळे चर्चेत होता. अहानने हे रिल्स व्हिडीओ बनवण्यामागचं एक खास कारण सांगितलं. काय म्हणाला अहान जाणून घेऊयात.

द हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना अहान म्हणाला की, ”मी इन्स्टाग्रामवर जसा व्हिडिओ बनवला, मी खऱ्या आयुष्यात अजिबात असा नाही. तर मी काम मिळवण्यासाठी तयार केलेला एक वेगळा चेहरा होता.” त्याने हे मान्य केले की, चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने वागावे लागते. अहानने म्हटले की, ”माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, काम मिळवण्यासाठी तू एका विशिष्ट पद्धतीने वागले पाहिजे. मला हे दुःख आहे की मी तसे वागलो, कारण मी प्रत्यक्ष जीवनात असा नाही.”

अहान पांडे पुढे म्हणाला, ”वास्तविक जीवनात मी खूप वेगळा आहे. माझे मित्र, कुटुंब आणि जवळचे लोक मला चांगले ओळखतात. मी सोशल मीडियावर जे दाखवतो, त्यापेक्षा मी खूप शांत आणि साधा आहे.” अहान पांडेने शेवटी हे स्पष्ट केले की, सोशल मीडियावरील त्याचा उद्देश केवळ काम मिळवण्याचा एक प्रयत्न होता. तो लवकरच ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली यांच्याबरोबर काम करणार आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा ‘सैयारा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

अहानच्या पहिल्या चित्रपट ‘सैयारा’ बद्दल बोलायचे झाले तर, मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे अनित पड्डानेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि आता तो ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये गणला जातो.

‘सैयारा’ या चित्रपटाला इतकं यश मिळेल, याची कल्पना कोणीच केली नव्हती. नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सैयारा’ने अनेक विक्रम मोडले आहेत. तरुण पिढी या चित्रपटाच्या फारच प्रेमात आहे. सुपरहिट लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट आजच्या काळातील तरुणांना प्रचंड आवडला. २७ वर्षीय अहान पांडे हा चिक्की पांडे आणि डीन पांडे यांचा मुलगा आहे.