चॅम्पियन्स ट्रॉफीचा यंदाचा भारत- पाकिस्तान सामना भारताने अगदी सहज जिंकला. भारताने पाकिस्तानला ब गटात १२४ धावांनी हरवले. भारताने तिथे सामना जिंकला आणि इथे बॉलिवूडच्या फेव्हरेट जोडीने म्हणजेच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याने राय बच्चनने एकच जल्लोष केला. अभिषेकने त्या दोघांचा भारताच्या विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना त्याने फोटोला ‘येस… कमॉन इंडिया.. जय हिंद’ असे कॅप्शनही दिले.
भारत- पाकिस्तान सामना म्हटल्यावर क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीच असते. त्यातही बच्चन कुटुंबियांसाठी क्रिकेट हा जिव्हाळ्याचा विषय. अमिताभही अनेकदा मैदानात जाऊन सामना बघायला प्राधान्य देतात. अमिताभ- अभिषेकसोबतच इतर बॉलिवूडकरही अशा कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थिती लावतात. रविवारी झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यासाठी जेवढी सर्वसामान्य जनता उत्सुक होती तेवढेच बॉलिवूडकरही उत्सुक होते. अक्षय कुमार, ऋषी कपूर यांच्यासह अनेकांनी या सामन्याच्या उत्सुकतेबाबत ट्विट केले होते.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कान चित्रपट महोत्सवामध्ये ऐश्वर्याचे जलवे पुन्हा एकदा पाहायला मिळाले होते. पण यावर्षीच्या कान महोत्सवात जेवढ्या नजरा ऐश्वर्यावर होत्या तेवढ्याच किंबहुना त्याहून जास्त नजरा आराध्यावर होत्या. अभिषेक जरी या महोत्सवाला जाऊ शकला नसला तरी त्याचा पाठिंबा तर ऐश्वर्याला होताच. त्याने इन्स्टाग्रामवरून ऐश्वर्या आणि आराध्याचे कान महोत्सवाचे अनेक फोटो शेअर केले होते.
ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सिनेमांच्या निवडीबाबत ती जास्त चोखंदळ झाली आहे. अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ सिनेमासाठी तिला आणि अभिषेकला एकत्र काम करण्याबाबत विचारण्यात आले होते. पण आता ऐश्वर्याने ओमप्रकाश मेहरा यांचा ‘फेणी खान’ हा सिनेमा करण्याचे निश्तिच केले आहे. या सिनेमात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर दिसणार आहे. अनिलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सिनेमातला त्याचा लूक याआधीच शेअर केला होता. पण ऐश्वर्याने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात ऐश्वर्या अखेरची दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.