अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेला अजय देवगण आणि इम्रान हाश्मीच्या ‘बादशाहो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात संवादही तितकेच दमदार आहेत. मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटातील व्यक्तिरेखांची आधी पोस्टर्सद्वारे ओळख करून देण्यात आलेली. त्यानंतर टिझरनंतर आता ट्रेलरमध्येही जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजय देवगण, इम्रान हाश्मी, इशा गुप्ता, इलियाना डिक्रूझ, विद्युत जामवाल, संजय मिश्रा यांच्या ‘बादशाहो’मध्ये मुख्य भूमिका आहेत. इम्रान आणि अजयचा ‘गँगस्टर स्वॅग’ पुन्हा एकदा या चित्रपटातून पाहायला मिळतोय. सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’मध्येही दोघांचा असाच अंदाज पाहायला मिळाला होता. ‘ये जो समय है ना, ये सबकी लेता है, समय समय पर, सही समय पर, सही तरह से लेता है’, ‘मौत जब सर पे होती है, जिंदगी की किमत पता चलती है,’ यांसारखे दाद मिळवणारे संवाद या ट्रेलरमधून ऐकायला मिळतात.

सव्वा दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रत्येक भूमिकेची ओळख होते. १९७५ मधील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. १९७५ मधील आणीबाणीदरम्यान सोन्याने भरलेला ट्रक लुटणाऱ्या सहाजणांची कथा या चित्रपटात मांडलेली आहे. ट्रेलरमध्ये पुरुषांसोबतच महिलांचेही अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चित्रपटात सनी लिओनी एका आयटम साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे.

वाचा : हरयाणाच्या भाजप नेत्यावर रवीना टंडनची सडकून टीका

रजत अरोरा यांनी लिहिलेला हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘बादशाहो’ चित्रपटासाठी अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि मिलन लुथरिया दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलंय. त्यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तेव्हा आता त्यांच्या या त्रिकूटाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan imran hashmi baadshaho trailer released
First published on: 08-08-2017 at 10:36 IST