बॉलिवूडमध्ये कलाकार त्यांच्या चित्रपटांतून आणि त्यांच्या कलेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. याच मनोरंजनाच्या जोरावर बऱ्याच वर्षांसाठी प्रेक्षकांच्या मनामध्ये हक्काचं स्थान निर्माण करण्याचे आव्हानही या कलाकारांसमोर असते. सध्याच्या दिवसांमध्ये बी टाऊनमध्ये विविध कलाकार नव्याने पदार्पण करत आहेत. पण, त्यांच्या या स्पर्धेतही काही अभिनेते मात्र अभिनयाच्या आणि चित्रपटांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करुन आहेत. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे अजय देवगण. काजोलसोबत विवाह थाटण्यापूर्वी नव्वदीच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री करिश्मा कपूर अजयच्या प्रेमात बुडाली होती. करिश्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अजयचे नाव काजोलशी जोडले गेले.

बॉलिवूडचा सिंघम काजोलशी विवाहबंधनात अडकण्यापूर्वी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. नव्वदीच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांच्यात प्रेम फुलले होते. जिगर’, ‘धनवान’, ‘संग्राम’, ‘सुहाग’ आणि ‘शक्तिमान’ या चित्रपटातून एकत्र दिसलेली अजय-करिश्माची जोडी त्याकाळी हिट ठरली होती. बॉलिवूडमध्ये याकाळात करिश्मा अजय देवगणच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. दोघांच्यात १९९२ ते १९९५ याकाळात करिश्मा-अजय एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. मात्र अचानक दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. हा दुरावा नक्की कोणत्या कारणामुळे झाला याचा अजूनपर्यंत उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र ‘आय जस्ट लव मूव्हीज’ नावाच्या वेबसाईटने दिलेल्यावृत्तानुसार, त्यावेळी अजय देवगणचे अन्य कोणासोबत तरी प्रेमसंबंध सुरु असल्यामुळे करिश्मा आणि अजय यांच्या नात्यात दुरावा आला. तसेच करिश्माने स्वत: हे नात्याला पूर्णविराम दिला होता.

करिश्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अजयने आपल्या आयुष्याची जोडीदार म्हणून काजोलची निवड केली. अजय देवगणने १९९९ मध्ये काजोलशी लग्न केले होते. बॉलिवूडच्या या स्टार जोडीला न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत. २००३ मध्ये न्यासाच्या जन्मानंतर काजोलने ‘फना’, ‘यू मी और हम’, ‘माय नेम इज खान’, ‘वी आर फॅमिली’, ‘टूनपुर का सुपरहिरो’ यांसारख्या चित्रपटात काम केले होते.

अभिनेता अजय देवगण ‘शिवाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. काजोलने त्याला या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये हातभार लावला होता. अजयच्या निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटाकडून त्याला खूप आशा होत्या मात्र त्याला म्हणावा तसे यश मिळाले नाही. दिवाळीच्या आनंदमयी वातावरणामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाय’पेक्षा  प्रेक्षकांनी करण जोहरच्या बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला पसंती दिली होती.