दाक्षिणात्य अभिनेता अखिल अक्किनेनीने १६ नोव्हेंबर २०२४ ला त्याची प्रेयसी झैनब रावदजीसह साखरपुडा केला होता. ही बातमी अभिनेत्याने स्वत: इन्स्टाग्रामवर झैनबबरोबरचे फोटो शेअर करत दिली होती. आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अखिलचे वडील अभिनेते नागार्जुन यांनी मुलाच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे.
नागार्जुन व त्यांची पत्नी अमला अक्किनेनी मोठ्या थाटामाटात मुलाचं लग्न लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. धाकटा मुलगा अखिलच्या लग्नासाठी नागार्जुन यांनी जंगी तयारी सुरू केली आहे. अखिल व झैनब यांच्या लग्नाला दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना आमंत्रण दिलं आहे. यासह त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं, त्यामुळे या लग्नाला कलाविश्वातील मंडळींसह राजकारणातील दिग्गज मंडळींचीही उपस्थिती असणार आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार अखिल अक्किनेनीची होणारी बायको झैनब रावदजी ही एका नामांकित व्यावसायिक कुटुंबातून आहे. तिने एमएफ हुसेन यांच्या ‘मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या चित्रपटात काम केलं आहे. तिचा स्वत:चा व्यावसायही आहे, तर अखिल अक्किनेनी हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो अनेक चित्रपटांमध्ये मुख्य नायक म्हणून झळकला आहे. अखिल व झैनब यांच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे. अभिनेता नागा चैतन्य व अभिनेत्री शोभिता धुलीपाला यांच्या लग्नाच्या सहा महिन्यांनंतर अखिल अक्किनेनीसुद्धा लग्न करणार आहे.
नागा चैतन्य व शोभिता धुलीपाला नुकतेच शोभिताच्या वाढदिवसानिमित्त परदेशात गेले होते. नागा चैतन्य व शोभिता आता भारतात परतले असून ते अखिलच्या लग्नासाठी आले असल्याचंही म्हटलं जात आहे. नागा चैतन्य व अखिल हे दोघे सावत्र भाऊ आहेत. नागा चैतन्य हा नागार्जुन व त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी लक्ष्मी दग्गुबाती यांचा मुलगा आहे, तर अखिल अक्किनेनी हा नागार्जुन व त्यांची दुसरी पत्नी अमला अक्किनेनी यांचा मुलगा आहे. नागार्जुन यांना दोन मुलं असून लवकरच त्यांचा धाकटा मुलगा लग्नबंधनात अडकणार आहे.