‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि प्रसिध्द अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) गेले काही दिवस त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षाअखेरीस अक्षयने एक गोड व्हिडीओ शेअर करत त्याच्या नात्याबद्दल जाहीर कबुली दिली होती आणि गर्लफ्रेंड ‘रमा’ म्हणजेच साधना काकतकरला त्याने सर्व चाहत्यांसमोर आणलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही सांगितलं. अशातच आता त्याच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे.

अक्षय आणि साधना येत्या मे महिन्यात बोहल्यावर चढणार आहेत. याबद्दल त्याने खास सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. “मे २०२५ ठरलं, आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी… तरीही मुलींनो, आय लव्ह यु… मी फक्त तुमचाच आहे” असं म्हणत त्याने लग्नाची तारीख सांगितली होती. आता त्याच्या केळवणाला सुरुवात झाली आहे.

अक्षयची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) अक्षय व साधनाचं केळवण साजरं केलं आहे. आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी असा खास बेत करत समृद्धीने अक्षय-रमाचं केळवण केलं आहे. तसंच तिने केळीच्या पानावर अक्षय-साधनाचं केळवण लिहीत हारांची सजावट केली होती. समृद्धीने या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य : समृद्धी केळकर इन्स्टाग्राम स्टोरी
फोटो सौजन्य : समृद्धी केळकर इन्स्टाग्राम स्टोरी

तसंच समृद्धीने अक्षय-साधना यांच्याबरोबरचा खास सेल्फी फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, अक्षय व समृद्धी हे एकमेकांचे खास मित्र आहेत. त्यांची युट्युबवरील ‘दोन कटींग’ सीरिज चांगलीच गाजली होती. या सीरिजमधील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. दोघे सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

फोटो सौजन्य : समृद्धी केळकर इन्स्टाग्राम स्टोरी
फोटो सौजन्य : समृद्धी केळकर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, अक्षयने बिग बॉस मराठीआधी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील त्याची ‘अबीर गुलाल’ ही मालिका काही दिवसांपुर्वी संपली. त्यानंतर आता लवकरच तो ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो संत निवृत्तीनाथांची भूमिका साकारत आहे.