‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. गेली चार वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच श्रेयाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ आणि तिची पोस्ट ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
श्रेया बुगडे हिने शेअर केलेला हा व्हिडीओ चला हवा येऊ द्या च्या मंचावरील आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत अक्षय कुमार दिसत आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने या कार्यक्रमात हजेरी लावली त्या दरम्यानचा आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार हा श्रेया बुगडेच्या कॉमेडीचे, तिच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहे. “तू फार म्हणजे फार टॅलेंटेड आहे. तुझ्यात विशेष कौशल्य आहेत. आम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी तुझे फार फार आभार”, असे अक्षय कुमार हा श्रेया बुगडेला बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना ती म्हणाली, “या देशाने पाहिलेल्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी तो एक आहे. मी अक्षरश: त्याचे चित्रपट बघत बघत मोठी झाली आहे आणि आज हे…!!! मी चंद्रावर पोहोचली आहे…, अक्षय कुमार सर तुमच्या या सर्व शब्दांसाठी तुमचे धन्यवाद. तुमच्या या शब्दांचा अर्थ माझ्यासाठी जग जिंकण्यासारखा आहे. चला हवा येऊ द्या आणि झी मराठी माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही सर्व माझ्यासाठी खूप मोठा भाग आहात.”
दरम्यान तिची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या होत्या. अभिनेता स्वप्निल जोशी याने या पोस्टवर कमेंट करत म्हटले की ‘सत्यवचन! प्रेक्षकांच्या मनात नेमके काय आहे’ त्याचे त्यांनी भाष्य केले. तर अभिजित खांडकेकर याने ‘तू याच्यासाठी पात्र आहेत’, असे म्हटले आहे. तर अभिनेत्री सोनाली खरे हिने ‘क्या बात है डार्लिंग’ अशी कमेंट केली आहे.