चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार त्यांच्या कलेला जितके महत्त्व देतात तितकेच हे कलाकार त्यांची समाजाप्रती आणि देशाप्रतीची जबाबदारीही जाणतात. गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरु असणाऱ्या तणावाचे वातावरण पाहता संपूर्ण देशात भारतीय लष्कराबद्दल असणारा आदर आणि सन्मान वाढलेला पाहायला मिळत आहे. कलाकारही मोठ्या उत्साहाने जवानांच्या बाजूने उभे आहेत. जवान आणि लष्कराप्रती असणारी हीच कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आणि पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात शहीद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने थेट जम्मू गाठले आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि देशाप्रती त्याला असणारा आदर कोणापासूनही लपून राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी अक्षयने शहीद गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली होती. तसेच त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनही सैन्यदलाचे आणि जवानांचे आभार मानले होते. जम्मू येथील बीएसएफ क्रम्पला भेट दिल्यानंतर ‘मी याला माझे भाग्यच समजतो की मला या ठीकाणआला भेट देण्याची संधी मिळाली आहे. मी नेहमी म्हणतो की मी ‘रील’ हिरो आहे. ‘रीअल’ हिरो तर तुम्हीच आहात’, असे अक्षय म्हणाला.

विविध बॉलिवूड कलाकारांमध्ये एक संवेदनशील आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा अभिनेता म्हणूनही अक्षय ओळखला जातो. त्यामुळे बीएसएफ बेसकॅम्पला त्याने दिलेली भेट प्रशंसनीय ठरत आहे. फक्त जवानांप्रतीच नाही तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही खिलाडी कुमारने मदत जाहीर केली आहे. आजवरच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अक्षय कुमारने त्यांच्या चित्रपटांतूनही अनेकदा सैन्यदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. जवानांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अक्षय कुमारला प्रेक्षकांनीही नेहमीच दाद दिली आहे. ‘हॉलिडे’, ‘बेबी’, ‘सैनिक’ अशा चित्रपटांत त्याने सैनिकाची भूमिका साकारली आहे.

खिलाडी कुमार सध्या त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असला तरीही त्यातूनच वेळ काढत त्याने बीएसएफ बेस कॅम्पला भेट दिली आहे. आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात खिलाडी कुमार झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच सेटवरील अनोखे असे छायाचित्र अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर नुकतेच पोस्ट केले होते. या चित्रपटात त्याच्यासह ‘दम लगाके हयशा’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर झळकणार आहे. या दोन्ही कलाकारांनी मथुरा येथे सदर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे.