अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टी एकाच चित्रपटात म्हटलं की दिग्दर्शक रोहित शेट्टी आठवल्याशिवाय राहत नाही. ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘सिम्बा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेता अक्षय कुमारने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अभिनेता रणवीर सिंह, अजय देवगण, अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि करण जोहर झळकत आहेत. विशेष म्हणजे रणवीर आणि अजयदेखील सूर्यवंशीचा एक भाग होणार असल्याचा सूचक संदेश या फोटोमधून देण्यात आला आहे.
दरम्यान, रोहित शेट्टी त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी आगामी प्रोजेक्टची माहिती देत असतो. ‘सिम्बा’च्या क्लायमॅक्समध्येही त्याने त्याच्या ‘सूर्यवंशी’ची घोषणा केली होती. या क्लायमॅक्समध्येही सिंघमची भूमिका वठविणारा अजय फोनवर अक्षयशी संवाद साधतांना दाखविण्यात आला होता. त्यामुळे रोहितच्या आगामी ‘सूर्यवंशी’मध्ये अजय, अक्षय आणि रणवीर या तिघांची जोडी जमणार असा अंदाज लावण्यात येत आहे.