अक्षय कुमार याचा २०१७ मधला पहिला प्रदर्शित होणारा सिनेमा म्हणजे ‘जॉली एलएलबी २’. आतापर्यंत या सिनेमाचा ट्रेलर लोकांना आवडला आहे. या सिनेमातले ‘गो पागल’ हे पहिले गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. आता याच सिनेमातले ‘बावरा मन’ हे गाणेही प्रदर्शित झाले आहे. हे गाणे तुम्हाला परत एकदा प्रेमात पाडायला भाग पाडेल. अक्षय कुमारचे या सिनेमातले हे सगळ्यात आवडते गाणे आहे. या गाण्यात हुमा कुरेशी आणि अक्षय कुमार यांच्यात दाखवण्यात आलेले संवाद आकर्षक आहेत. या गाण्यात हुमा कुरेशी फारच सुंदर दिसत आहे. पण या गाण्यात अक्षय वेगळ्या पद्धतीनेच प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. तो हुमाला सांगतो की, संपूर्ण लखनऊमध्ये माझ्यासारखा नवरा शोधून दाखव जो आपल्या बायकोला दारुचे पेग बनवून देतो. यात अक्षय एका मुलाचा बाबाही दाखवण्यात आला आहे.

बावरा मन फार रोमॅण्टीक गाणे आहे. या गाण्याला जुनैद वासीने लिहिले आहे आणि चिरंतन भट्टने हे गाणे स्वरबध केले आहे. जुबिन नौटियाल आणि निती मोहनने हे गाणे गायले आहे. राजू खानने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. या गाण्याचे चित्रिकरण लखनऊमधल्या आंबेडकर पार्कमध्ये आणि रेसीडेंसीमध्ये करण्यात आले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी सांगितले की, या गाण्यात अक्षय, हुमाला त्याच्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद देत आहे. गाण्याच्या शब्दांकडे लक्ष देण्याचे सुचवून अक्षयने इन्स्टाग्रामवर लिहिले की, हे माझे सगळ्यात आवडते गाणे आहे आणि गाण्याच्या बोलांकडे लक्ष द्या. हे खूप सोपे आणि सुंदर गाणे आहे.

दरम्यान, सुभाष कपूर दिग्दर्शित हा सिनेमा १० फेब्रुवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा हा आगामी सिनेमा २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा सिक्वल आहे. २०१६ मध्ये अक्षय कुमारच्या सिनेमांना प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली होती. त्याचे ‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’ आणि ‘हाऊसफुल ३’ हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले होते. त्यामुळे येत्या वर्षामध्ये प्रेक्षकांच्याही त्याच्या सिनेमांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या असणार यात शंकाच नाही. पण, सध्यातरी अनेकांचेच लक्ष अक्षय कुमारच्या या सिनेमाकडे लागून राहिले आहे. ‘जॉली एलएलबी २’ या सिनेमाव्यतिरिक्त अक्षय कुमारचा ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ हा सिनेमाही येत्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबतच अमुपम खेर, भूमी पेडणेकर हे कलाकारही झळकणार असून खिलाडी कुमार आणि अनुपम खेर यांचा एकत्रितपणे असा हा २० वा सिनेमा आहे.