scorecardresearch

Video : राणादा- पाठकबाईंचा दणक्यात साखरपुडा, एकमेकांना अंगठी घालतानाचा व्हिडीओ व्हायरल

अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. नुकतंच त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे. अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. हार्दिकने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो अक्षयला प्रपोज करत अंगठी घालताना दिसत आहे. तर दुसरीकडे अक्षया गाणी गात त्याला अंगठी घालत आहे. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले आहे. यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला आहे. याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं आहे.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या साखरपुडा केल्याच्या बातमीने चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रेटी कमेंट करताना दिसत आहे. यात अनेकांनी त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसले होते. त्यांच्यातील खास बॉन्डिंगची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर झाली होती. मात्र त्यांनी याबाबत कधीच स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं. पण अखेर आता या जोडीनं आपल्या नात्याला नाव देत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshaya devdhar and hardik joshi engagement video photos viral on social media nrp