अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी अलाया फर्नीचरवालाने आतापर्यंत जरी एकाच चित्रपटात काम केले असले तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अलाया दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा अलायाने ऐश्वर्यच्या दुबईमध्ये पार पडलेल्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजेरी लावल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ ऐश्वर्य ठाकरेची आई व निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता अलायाने अफेअरच्या चर्चांवर वक्तव्य केले आहे.

अलायाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ऐश्वर्य ठाकरेसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर वक्तव्य करत पूर्णविराम दिला आहे. ‘मी या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. ऐश्वर्य हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि अतिशय हुशार व्यक्ती आहे. माझ्या विषयी सतत काही तरी चर्चा सुरु असतात. त्यामुळे आता माझ्या आजूबाजूच्या लोकांना या गोष्टीची सवय झाली आहे’ असे अलायाने म्हटले आहे.

आणखी वाचा : सारिकासोबत ब्रेकअप… रोमी यांच्यासोबत लग्न; अशी आहे कपिल देव यांची ‘लव्ह लाइफ’

पुढे ती म्हणाली, ‘हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी माझ्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यावर बोलणे टाळते. मला असे वाटते की आपण दररोज एक माणूस म्हणून स्वत:ला कसे आणखी चांगले बनवू शकतो याकडे लक्ष द्यायला हवे. लॉकडाउनमध्ये मी हेच केले आहे.’

ऐश्वर्य आणि अलाया हे एकमेकांना खूप आधीपासून ओळखत असल्याचे तिने म्हटले आहे. ते दोघे एकत्र अॅक्टिंग आणि डान्स क्लासला जायचे. पण अनेकदा त्यांनी एकत्र फोटो काढण्यास फोटोग्राफरला नकार दिला होता. ‘जर फोटोग्राफर्सने फोटो काढले तर काय होणार हे मला माहिती होते. जर एखाद्या ठिकाणी आम्ही दोघं एकत्र गेलो तर तेथून बाहेर निघताना देखील आम्ही दोघं एकत्रच दिसणार. तेथे देखील अनेक फोटोग्राफर आम्हाला फोटोसाठी एकत्र पोज द्यायला सांगायचे. पण त्या फोटोंमुळे मला नंतर त्रास होऊ शकतो असे मी हसत म्हणायचे आणि फोटोसाठी नकार देत असे’ असे अलाया म्हणाली.