आलिया भट्टने अल्पावधित बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती वेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरली. बॉलिवूडमधील प्रवासामध्ये तिच्यावर बालिशपणावरुन अनेकदा टिकाही झाली. मात्र, याकडे दुर्लक्ष करुन तिने बॉलिवूडमधील आपला प्रवास सुरु ठेवला. या प्रवासात तिने स्वत:च्या अभिनयातील बाज दाखवून दिला. ‘उडता पंजाब’ या चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका अभिनयाचा वेगळा बाज दाखविणारी अशीच होती.

२४ वर्षीय आलियाला नेटिझन्सनीं बालिश ठरविण्याचे अनेक किस्से आहेत. मात्र, नुकतेच आलियाने स्वत:ला बालिशपणाचा आलेला अनुभव शेअर केला. वयाच्या मानाने तिच्या चेहऱ्यावरील भाव हे ती अल्पवयीन असल्याचे वाटते. यावरुनच ‘हिंदूस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने लंडनमधील किस्सा सांगितला. ती म्हणाली की, मी वयाने लहान वाटत असल्यामुळे लंडनमधील एका बारमध्ये मला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यांना मी माझे ओळखपत्र देखील दाखवले. मात्र, त्यांनी मला प्रवेश दिलाच नाही.

यावेळी आलियाला घरातील सर्वात छोटी असल्यामुळे काही फायदे झाले का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना आलिया म्हणाली की, लहान असल्यामुळे सर्व लोक माझ्यावर अधिक प्रेम करतात. मात्र, घरातील कोणतीही गोष्ट मला सर्वात शेवटी कळते. त्यामुळे मला लहान असल्याचा रागही येतो. बॉलिवूडमध्ये सध्या रंगणाऱ्या चर्चेनुसार, आलिया भट्टने शाहरुख सोबतचा चित्रपट नाकारला आहे. तिच्याकडे सध्या अयान मुखर्जीचा ‘ड्रॅगन’ आणि ‘गिल्ली बॉय’ हे चित्रपट आहेत. या चित्रपटामुळे तिच्याकडे दुसऱ्या चित्रपटाला ती वेळ देऊ शकत नाही. त्यामुळेच तिने बॉलिवूडच्या बादशहासोबत काम करण्यास नकार दिल्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय.