करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे कलाविश्वातील कामकाजही ठप्प असल्याचं दिसून येतं. मात्र या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी अशा गरजूंना मदत केली आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी काम करणाऱ्या कामगारांना मदत केल्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गरजू कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात लॉकडाउन घोषित केल्यामुळे अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिज यांचं चित्रीकरण रखडलं आहे. त्यातच चित्रीकरणाच्या सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मात्र सध्या अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. या काळात अनेक सेलिब्रिटींनी अशा कामगारांना मदतही केली आहे. मात्र बिग बींनी आता त्यांच्या मदतीचा मोर्चा दाक्षिणात्य कलाविश्वाकडे वळविला आहे. त्यांनी तेलुगू सिनेकर्मचाऱ्यासाठी १.८ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी तेलुगू सिनेकर्मचाऱ्यांना केलेल्या मदतीनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. ‘ अमिताभ जी यांनी तेलुगू कलाविश्वातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १५०० रुपयांचे १२ हजार रिलीफ कुपन दिले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या या मदतीसाठी बिग बी तुमचे मनापासून आभार. या कुपनचा वापर बिग बाजारमध्ये करता येऊ शकतो, असं ट्विट चिरंजीवने करुन ही माहिती दिली.

दरम्यान, आतापर्यंत मराठी कलाविश्वापासून ते दाक्षिणात्य कलाविश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान,आमिर खान, महेश बाबू,सोनू सुद,चिरंजीवी या सारख्या कलाकारांचं आवर्जुन नाव घेतलं जातं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan donates rs 1 8 crore to telugu cinema workers chiranjeevi says thanks ssj
First published on: 18-04-2020 at 08:37 IST