अभिनेता आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेले अमोल पालेकर यांनी आजवर निवडक कामं केली असली तरी त्यांची मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख आहे. अमोल पालेकर हे स्वत:ला धूमकेतू म्हणवतात जो दहा वर्षांतून एकदाच येतो. याचं कारण म्हणजे त्यांना निवडक भूमिका साकारायला आवडतात. अमोल पालेकर लवकरच ‘हल्ला २००’ या सिनेमात एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरु मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
‘हल्ला २००’ या सिनेमात अमोल पालेकर एका निवृत्त न्यायाधिशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अमोल पालेकर यांनी या सिनेमाबद्दल आणि त्याच्या भूमिकेविषयी खुलासा केला आहे. “या सिनेमात दाखवण्यात आलेला महिलांचा लढा सत्य घटनेवर आधारित असल्याने मला या सिनेमाची कथा आवडली” असं ते म्हणाले. या मुलाखतीत अमोल पालेकर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सिनेसृष्टीत घडलेल्या बदलांवर मत मांडलं आहे. यावेळी त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे नवोदितांना संधी उपलब्ध झाल्याचं सांगत असतानाच अभिनेत्रींना मिळणाऱ्या भूमिकांबद्दल एक विधान केलं आहे.
गेल्या ५० वर्षांत सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचं स्थान कसं बदललं आहे? यावर उत्तर देताना अमोल पालेकर म्हणाले, “दुर्दैवाने, जर आपण आपल्या मुख्य प्रवाहातील सिनेमांकडे पाहिलं तर एका विशिष्ट प्रकारच्या साचेबद्ध भूमिका नायिका साकारायच्या. एकेकळी अभिनेत्री एकतर संतोषी माँ किंवा भारत माता असायची. किंवा एखाद्या आयटमनंबरमध्ये झळकायची. स्त्रीकेंद्रित सिनेमा हे दुर्मिळ होते पण ओटीटीच्या उदयामुळे महिला पात्रांसाठी उत्कृष्ट पटकथा लिहिल्या गेल्या.” असं पालेकर म्हणाले.
एक दिग्दर्शक म्हणून आपण कायमच महिलांचं सामर्थ्य त्यांच्यातील शक्ती मांडण्याचा प्रयत्न केल्याचं अमोल पालेकर म्हणाले. तसचं ओटीटीमुळे अनेक नवीन, हुशार कलाकार वेब सीरिजच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करत आहेत. त्यामुळे स्टार्सची मक्तेदारी कमी झाल्याचा आनंद असल्याचं ते म्हणाले.