या जगात अशी बरीच माणसं आहेत ज्यांना भरपूर प्रसिद्धी मिळते, पण त्यांचा शेवट मात्र रहस्यमय आणि विदारक होतो. भारतात सांगायचं झालं तर परवीन बाबीपासून सुशांत सिंग राजपूतपर्यंत कित्येक प्रसिद्ध कलाकारांच्या नशिबात असाच शेवट लिहिला होता. हॉलिवूडमध्येही अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांचं जग सोडून जाणं कित्येकांच्या मनाला चटका लावून गेलं. त्यापैकीच एक लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री म्हणजे मेरलिन मन्रो.

मेरलिन मन्रोच्या सौंदर्याची प्रशंसा आजच्या काळातील प्रेक्षकही करतात. नुकताच तिच्या आयुष्यावर बेतलेला ‘ब्लॉन्ड’ हा बायोपिक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. क्यूबन अभिनेत्री अ‍ॅना दे अर्मस हिने यामध्ये मुख्य भूमिका निभावली आहे आणि सध्या सोशल मिडियावर तिचं भरपूर कौतुक होत आहे. या चित्रपटात मेरलिनमन्रोच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, शिवाय केवळ ३६ व्या वर्षी तिचा झालेला मृत्यू यामागचं गूढ नेमकं काय होतं याचा शोध घ्यायचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.

आणखी वाचा : ‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात; लवकरच समोर येणार अल्लू अर्जुनचा नवीन लूक

४ ऑगस्ट १९६२ या दिवशी मेरलिन मन्रोचा मृत्यू अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला असं म्हंटलं जातं. पण आजही लोक तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता या मतावर ठाम आहेत. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांच्याबरोबर तिचं अफेअर होतं अशा चर्चाही त्यावेळेच सुरू होत्या. यामुळेच तिच्या मृत्यूमागे कोणतंतरी राजकीय षडयंत्र असल्याचा संशय असल्याच्या आजही चर्चा होतात.

मेरलिनने ३ लग्नं केली आणि तिनही लग्नात ती अयशस्वी ठरवली. १९६१ मध्ये आपल्या तिसऱ्या पतीपासून वेगळी झाल्यानंतर तिच्या आणि जॉन एफ केनडी यांच्यातल्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं. त्या काळात कित्येक मीडिया रीपोर्टमधून समोर आलं की मेरलिनचे केनडी यांच्याबरोबरचे संबंधच तिच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. अर्थात केनडी आणि मेरलिन यांच्यातल्या या नात्याला कधीच पुष्टी मिळाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ब्लॉन्ड’ हा चित्रपट याच नावाच्या एका कादंबरीवर आधारीत आहे. यामध्ये मेरलिन तिच्या शेवटच्या दिवसात मानसिक आजाराने त्रस्त होती आणि तिच्याबाबत अशा कित्येक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकात लॉस एंजिलिस पुलिस डिपार्टमेंटने सांगितल्यानुसार मेरलिन ही मानसिक रुग्ण होती आणि तिने अंमली पदार्थांचं अतिसेवन करून स्वतःला संपवून टाकलं. या थेअरीवर आजही कुणाचा विश्वास बसलेला नाही त्यामुळे मेरलिन मन्रोच्या मृत्यूमागील रहस्य हे आजही कायम आहे.