एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित ‘अनन्या’ येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’, असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’च्या जिद्दीचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एका क्षणी मन सुन्न करणारा हा ट्रेलर क्षणार्धात मनाला जगण्याची नवी उमेद देणाराही आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा हृता दुर्गुळे साकारत आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया ‘अनन्या’चे निर्माते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी ‘अनन्या’ दिसत आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र ‘अनन्या’ पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना यात दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या ‘अनन्या’चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ हा खूप मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे.

आणखी वाचा-आलियाशी लग्न करण्याआधीच विवाहित आहे रणबीर? पहिल्या पत्नीबाबत केला खुलासा

पाहा ट्रेलर :

दिग्दर्शक प्रताप फड ‘अनन्या’बदल म्हणतात, ” गेल्या अनेक वर्षांपासून ‘अनन्या’ ला मी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर सादर केले. ‘अनन्या’चा हा स्फूर्तिदायी प्रवास प्रत्येकाने पाहावा, याकरता मी हा चित्रपट बनवण्याचा विचार केला. यामधील ‘अनन्या’चा ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्यासोबत चाललेला लढा प्रत्येकालाच जगण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. हृताने अगदी उत्तमरित्या ‘अनन्या’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिने घेतलेली मेहनत ट्रेलरमध्येही दिसत आहे. यासाठी ती दिवसातील अनेक तास सराव करत होती. नाटकात आम्हाला इतक्या भव्य स्वरूपात हा विषय मांडता आला नाही, मात्र चित्रपटात या विषयाला आम्हाला योग्य न्याय देता आला. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया यांचे विशेष आभार मानतो, त्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.”

आणखी वाचा- कोणी म्हटलं ‘मोटा भाई’ तर कुणी ‘वडापाव’, वाढलेल्या वजनामुळे अल्लू अर्जुन ट्रोल

‘अनन्या’ची भूमिका साकारणारी हृता दुर्गुळे आपल्या अनुभवाबद्दल सांगते, ” ज्यावेळी ‘अनन्या’साठी माझी निवड झाल्याचा फोन आला, आधी मला विश्वासच बसत नव्हता. काही दिवस हे खरं आहे, हे मनाला समजवण्यात गेले. कारण ‘अनन्या’च्या निमित्ताने माझे चित्रपटात पदार्पण होणार होते. पहिलाच चित्रपट एवढा मोठा, याहून आनंदाची गोष्ट कोणती असूच शकत नाही. या भूमिकेसाठी मला शारीरिक, मानसिक अशा सगळ्याच गोष्टींवर काम करावे लागले. प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अर्थात यात मला अनेकांची साथ लाभली. ‘अनन्या’चा प्रवास माझ्यासाठी सुद्धा खूप आव्हानात्मक होता. या चित्रपटातून म्हणजेच ‘अनन्या’कडून मी काही गोष्टी शिकले त्या म्हणजे आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानून आयुष्य पुढे न्यायचे आणि छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे. आयुष्यात हे जमले तर आपले आयुष्य सुखकर होते.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाब्रिया म्हणतात, ”मराठी कॉन्टेन्ट हा नेहमीच अर्थपूर्ण असतो. यात अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. त्यामुळे असे चित्रपट जगभरात पोहोचावे, असे मला मनापासून वाटते. ‘अनन्या’… मुळात हा विषय खूप वेगळा आहे. कथा खूप प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आहे आणि हा विषय प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावा, याकरताच मी ‘अनन्या’चा एक भाग झालो. बऱ्याच काळानंतर एव्हरेस्ट असा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.” तर निर्माते रवी जाधव म्हणतात, ”हे नाटक जेव्हा मी पहिले तेव्हाच या नाटकाचे चित्रपटात रूपांतर व्हावे, अशी माझी इच्छा होती आणि आता ती पूर्णत्वास येत आहे. मला आनंद आहे या चित्रपटाचा मी एक भाग आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya official trailer release today hruta durgule chetan chitnis film coming on 22 july mrj
First published on: 28-06-2022 at 09:02 IST